• Sat. Jun 6th, 2026
    Yugendra Pawar: अजितदादांचा अपघात, VSR विमान कंपनीवरील कारवाई, राज्यसभा निवडणूक ते राष्ट्रवादी विलीनीकरण; युगेंद्र पवारांनी स्पष्ट केली भूमिका

    व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत उद्या रोहित पवारांसोबत पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले आहेत. शरद पवार आणि पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

    अजित पवारांच्या अपघातावर युगेंद्र पवारांनी केला कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते भावुक झाले होते. त्यांनी देखील व्हीएसआर या विमान कंपनीवर नाराजी व्यक्त केली असून, उद्या ते आमदार रोहित पवार यांच्या समवेत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

    आज बारामतीत आल्यानंतर युगेंद्र पवार यांनी नटराज नाट्य मंदिरात भरवलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी किरण गुजर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील घटनाक्रमाचा तपशील सांगितला. दरम्यान युगेंद्र पवार यांनी कंपनी विमान सेवा देण्यामध्ये निष्काळजी पणा दाखवत होती असा आरोप देखील केला. त्यांनी तपासातील दिशा अधिक अचूकपणे स्पष्ट होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

    दरम्यान युगेंद्र पवार यांना पार्थ पवार व शरद पवार यांच्या राज्यसभेतील खासदारकीच्या उमेदवारी संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, पार्थ पवार यांची उमेदवारी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र पार्थ हे माझे मोठे बंधू असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असेल तर मला खूप आनंद आहे. ते निश्चितच राज्यसभेमध्ये खूप उजवी कामगिरी करतील यात शंका नाही असे ते म्हणाले.

    Maharashtra TimesAhilyanagar Crime: पत्नी नांदायला येत नाही म्हणून राग, त्यात सासऱ्याच्या नेहमीच्या धमक्या; अमितने मित्राच्या मदतीने सासऱ्याचा काटा काढला

    तसेच शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारी संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील साहेब यांच्या अनुभव व त्यांचे कार्य हे अत्यंत मौलिक असून, त्यांच्या अभ्यासाचा देशाला फायदा होत असल्याने सर्वांच्या इच्छेनुसार साहेब हे राज्यसभेत जावेत अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

    दोन्ही राष्ट्रवादी एकत्र विलीनीकरणा संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, ती अजितदादांची इच्छा होती साहेबांच्यासाठी अजित दादांनी दोन्ही पक्ष एकत्र करण्याची भूमिका घेतली आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुतारीचे अनेक उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावर लढले..! हे सर्वांना माहित आहे. जर एकत्र होणार नसते तर ते का लढले असते, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

    Maharashtra TimesSharad Pawar: शरद पवार पुन्हा एकदा केंद्रस्थानी, महायुती मविआचा ‘तो’ उमेदवार पाडणार? ‘दुसरी’ मतं गेम करणार?

    मात्र आता विलीनीकरणाचे पुढे काय यावर आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते सांगू शकतील असे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा