नाशिक/त्र्यंबकेश्वर
हरसूल आणि पेठ परिसरात सलग तीन दिवसांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारपासून (दि. २२) सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका मंगळवारीही (दि. २४) कायम राहिली. या कालावधीत तब्बल पाचवेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद मेरी येथील भूकंपमापन केंद्रात करण्यात आली.
त्र्यंबकेश्वरला भीतीचे सावट
त्र्यंबकेश्वर आणि हरसूल गाव यामध्ये फार अंतर नाही. जास्त परिमाणाचा भूकंपाचा धक्का बसला, तर त्याची झळ त्र्यंबकेश्वर शहराला बसणार आहे. येथे टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. अनधिकृत पद्धतीने होत असलेली बांधकामे दर्जेदार नसतात. त्यात पुन्हा निकष पाळलेले नसतात. साहजिकच नैसर्गिक आपत्तीत सर्वप्रथम अशी बांधकामे कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.हरसूल भागात दोन वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे जनजीवन भयभीत झाले आहे. शासन यंत्रणा याबाबत अभ्यास सुरू असल्याचे सांगतात. मात्र, दुर्दैवाने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ आली, तर त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी प्रशासनाकडून केलेली दिसून येत नाही. – मिथून राउत, रहिवासी, हरसूल
वार वेळ भूकंपाचे धक्के (रिश्टर स्केलमध्ये)
रविवार- सायंकाळी ७.४९ मिनिटे १.५
रविवार- रात्री ९.३५ मिनिटे १.५
सोमवार- पहाटे ५.३ मिनिटे १.५
सोमवार- सकाळी ७.२८ मिनिटे १.५
मंगळवार- सकाळी ६.४८ मिनिटे १.५