Eknath Shinde: भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष निर्माण झाला आहे. नवी मुंबईतील घडामोडींचे पडसाद आता ठाण्यात पडसाद उमटू लागले आहेत. दोन्ही पक्षांमधील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
नवी मुंबईत परिवहन समितीमध्ये नियमबाह्य कामकाज केल्याचा आरोप करत शिंदेसेनेनं भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. पण त्यानंतरही नवी मुंबईत शिंदेसेनेची गोची करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचे उट्टे शिंदेसेनेनं ठाण्यात काढण्यास सुरुवात केली आहे.
सत्तेत असलेल्या भाजपला शिंदेसेनेनं पहिल्याच महासभेत जेरीस आणलं आहे. त्यामुळे भाजपवर विरोधी बाकांवर बसावं का, असा विचार करण्याची वेळ आली आहे. तसं घडल्यास ठाण्यात मोठी उलथापालथ घडेल. नवी मुंबईत भाजप आणि शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात लढली. तिथे शिंदेसेना विरोध पक्षात बसली आहे. ठाण्यात दोन्ही पक्षांची युती असल्यानं भाजप सत्तेत आहे. त्यांच्याकडे उपमहापौरपद आहे. अन्य समित्यांवरही भाजपनं दावा केला आहे.
नवी मुंबईत संख्याबळानुसार परिवहन समिती सदस्यांची निवड करणं अपेक्षित असताना भाजपनं त्यांचेच सदस्य दिले. त्यातून भाजप विरुद्ध शिंदेसेना असा संघर्ष निर्माण झाला. त्याचे परिणाम आता ठाण्यात दिसू लागले आहेत. प्रशासकीय राज असताना झालेल्या कारभाराबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर महासभेत उत्तरं मिळतील अशी अपेक्षा भाजपला होती. पण त्यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे ठिणगी पडली आहे.
नवी मुंबईत परिवहन समिती सदस्यांच्या निवडीसंदर्भात भाजपनं घेतलेली आक्रमक भूमिका ठाण्यात शिंदेसेनेकडून घेतली जात आहे. ठाणे महापालिकेत स्थायी समिती सदस्यांसह प्रभाग समित्या, परिवहन, शिक्षण, सुधार समिती सदस्य निवडीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. नवी मुंबईत भाजपनं ताठर भूमिका कायम ठेवल्यास ठाण्यात भाजपला अन्य समित्यांमधील वाटा विसरावा लागेल, अशी भूमिका शिंदेसेनेनं घेतल्याचं कळतं.
