Kirit Somaiya: माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे भाजपनं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या संदर्भातील पत्र प्रदेश भाजपनं प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात सोमय्यांसह ८ जणांची नावं आहेत.
मतदार यादी पुनर्निरीक्षणाला निवडणूक आयोगाकडून एप्रिलमध्ये सुरुवात होईल. निवडणूक यादीतील दुबार, अवैध मतदार बाद करण्याचं काम निवडणूक आयोग हाती घेईल. यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपनं आपल्या प्रतिनिधींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ८ जणांची नावं आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमय्या यांच्यासह ८ नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या, राज्यसभेचे खासदार भागवत कराड , आमदार रणधीर सावरकर, प्रदेश महामंत्री माधवी नाईक, आमदार मंगेश चव्हाण , माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, माजी आमदार सुनिल राणे, माजी जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांची निवड भाजपनं एसआयआरचे प्रतिनिधी म्हणून केली आहे.
२०१८ मध्ये उद्धव ठाकरेंच्या एकसंध शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर भाजपनं २०१९ मध्ये किरीट सोमय्या यांचं लोकसभेचं तिकीट कापलं. यानंतर २०२४ मध्ये ठाकरेंचा पक्ष सोबत नसतानाही भाजपनं सोमय्या यांना संधी दिली नाही. सोमय्या यांची खासदारकी सलग दोनदा हुकली. मात्र त्यानंतरही सोमय्या पक्षासाठी सक्रिय आहेत. विविध विषय हाती घेऊन ते पक्षासाठी मैदानात उतरत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या जन्म प्रमाणपत्रांमधील घोळ समोर आणत आहेत. सोमय्या राज्यातील विविध भागांचे दौरे करुन जन्म प्रमाणपत्रांमधील घोळ पुढे आणत आहेत. मालेगाव, अकोला, अमरावतीसह विविध जिल्ह्यांचे दौरे सोमय्या यांनी केले आहेत. बोगस लाभार्थ्यांच्या याद्या समोर आणून कारवाईची आग्रही मागणी करत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
लव्ह जिहाद रोखण्यासाठी लग्नाच्या नोंदणीसाठी असलेल्या कायद्यात बदल करण्याची मागणी सोमय्या यांनी गेल्याच आठवड्यात केली. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. सोमय्या यांची सक्रियता पाहता पक्षानं त्यांच्याकडे एसआयआर संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
