• Sat. Mar 7th, 2026

    Paper Leak: बारावी पेपरफूट प्रकरणात कोचिंग क्लास चालकासह विद्यार्थी गजाआड; डिजिटल सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    Paper Leak: बारावी पेपरफूट प्रकरणात कोचिंग क्लास चालकासह विद्यार्थी गजाआड; डिजिटल सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    Magpur News: या घटनेमुळे डिजिटल माध्यमांचा वाढता गैरवापर, खासगी शिकवणी संस्थांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांकडील मोबाईल वापरावर नियंत्रण या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. पालकांकडून परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी होत आहे.

    बारावी पेपरफूट प्रकरणात कोचिंग क्लास चालकासह विद्यार्थी गजाआड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या बारावी बोर्डाच्या पेपरफूट प्रकरणात पोलिसांनी कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. या प्रकरणात प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, विभागीय शिक्षण मंडळातील कुणाचा सहभाग आहे का आणि डिजिटल माध्यमातून गळती कशी झाली, याचा सखोल तपास सुरू आहे. निशिकांत मूल (वय ४५, मानकापूर) आणि फरहान अख्तर (वय १९, कामगारनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निशिकांत हा खासगी शिकवणी वर्गाचा संचालक असून फरहान हा त्याच्याशी संबंधित विद्यार्थी असल्याची माहिती पुढे आली आहे.

    सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर १८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे पर्यवेक्षक सतर्क झाले. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने महिला शिक्षिकेने तिची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्टफोन आढळला. नियमांनुसार तो तात्काळ जप्त करण्यात आला. फोनची तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि त्यांची सोडवलेली उत्तरे उपलब्ध होती. याच ग्रुपमध्ये संबंधित विद्यार्थिनी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत या ग्रुपचा संबंध निशिकांत मूल याच्या शिकवणी वर्गाशी असल्याचे समोर आले.

    पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये निशिकांत हा ॲडमिन होता, तर फरहान प्रश्नांची उत्तरे तयार करून विद्यार्थ्यांना पाठवत होता. १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या फिजिक्सच्या पेपरपूर्वीही अशाच प्रकारे प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार प्रश्नपत्रिकेचा प्रसार मर्यादित गटापुरता झाला असून राज्यव्यापी गळती झाल्याचे सध्या तरी आढळलेले नाही. त्यामुळे फेरपरीक्षेबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर अधिक कडक उपाययोजना राबविण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

    सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पथकाकडून व्हॉट्सॲप ग्रुपचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. आणखी काही संशयितांची नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळाचा आधार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
    .

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा