• Fri. Mar 13th, 2026
    Rohit Pawar Emotional : भावूक रोहित पवारांचा सभागृहात सुनेत्रा काकूंना शब्द, ‘मदत लागेल तिथे मी तयार असेन’

    रोहित पवार अजित पवार यांच्या निधनाबद्दलच्या शोक प्रस्तावावर बोलताना सभागृहात प्रचंड भावूक झाले. त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आपल्या काकू तथा राज्याच्या उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा काकू यांनादेखील भर सभागृहात शब्द दिला.

    रोहित पवार यांचा सभागृहात सुनेत्रा काकूंना शब्द(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दलच्या शोक प्रस्तावावर भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार हे प्रचंड भावूक झाले. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्यासोबत आपलं नातं कसं होतं, याबाबत रोहित पवार यांनी भाष्य केलं. अजित पवार यांनी आपल्याला काय-काय सल्ला दिला याबाबतही रोहित पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांनी आपल्याला एकदा शारीरिक वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. हे सांगत असतानाच त्यांनी आपल्याला राजकीय वजन वाढवण्याचा सल्ला दिला होता, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर बोलताना रोहित पवार यांना यावेळी अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी आपल्या काकू तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना कायम सोबत असल्याचा शब्द दिला.

    अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेत दोषी असणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय किंवा शिक्षा केल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचं रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांनादेखील भर सभागृहात शब्द दिला. “मला काकींना सांगायचं आहे. काकी तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये या छोट्या कार्यकर्त्यांचं, तुमच्या पुतण्याला जिथे कुठे मदत लागेल तिथे मी तयार असेन. जेवढं बोलेन तेवढं कमी आहे. काकांच्या विचारांवर आणि काकांच्या स्टाईलने नक्कीच काम करत राहीन. धन्यवाद. रामकृष्ण हरी”, असं रोहित पवार म्हणाले.

    “अध्यक्ष महोदय, माझे अजित काका, महाराष्ट्राचे अजित दादा, विकासाचे अजित दादा, आजचा हा प्रसंग माझ्यासाठी आणि सर्वांनाच प्रचंड भावनिक आहे. शरद पवार यांच्या बरोबर ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारणात प्रेरणा घेतली तो आमचा अभिमान, स्वाभिमान, आमचे आधार, माझे काका आणि महाराष्ट्राचे अजित दादा, ज्यांच्या शोक प्रस्तावावर बोलण्यास आज मी या ठिकाणी उभा आहे”, असं रोहित पवार सुरुवातीला म्हणाले.

    “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हा शोक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मी पाठिंबा देतो. 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस असा अजित दादांचा प्रवास, पायाखालची जमीन सरकणे काय असते ते 28 जानेवारीला आम्ही सर्वांनी अनुभवलं. अजित दादांचं कार्य, हे 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. माझं वय 40 आहे, माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव अजित काकांचा राजकारणात होता. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं काही मिनिटांत बोलणं तसं सोपं नाही. कितीही पानं वाचली तरी त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, त्यांनी केलेली कामे जेवढं बोलेल तेवढं कमी आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

    रोहित पवार काय-काय म्हणाले?

    “1982 मध्ये ते छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले. त्यावेळेस सुरु झालेला प्रवास हा 2026 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काही काळ अजून मिळाला असता, काही वर्षे त्यांना मिळाले असते तर राज्याचं प्रमुख राजकीय स्थान म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अजित दादा झाले असते हा आम्हाला विश्वास आहे.”

    “या विधानसभेत आल्यानंतर अजूनसुद्धा अजित दादा कुठे बसले आहेत, आमच्याकडे लक्ष ठेवून असतील, अधिवेशनात येत असताना अजूनही आपल्याल आठवत असेल, त्यांची कपडे घालण्याची स्टाईल, कधीतरी गॉगल घालणार, त्यांच्याबरोबर आमदारांचा घोळका, कार्यकर्त्यांचा घोळका, मीडिया बरोबर मी बोलत असेल तर मागून मिश्किलपणे एखादा टोमणा मारणं असेल, त्याचबरोबर अधिवेशनात बसल्याबरोबर कोण काय बोलतंय, शांतपणे या अधिवेशनात काय चाललंय हे बारकाईने अजित काका बघत असत.”

    “त्याचबरोबर भाषण करत असताना मध्येच कुणी अडवलं, थांबलं, नाहीतर खूप आवाज केला तर मिश्किलपणे असेही बोलून जायचे, जास्त आवाज केला तर तू मंत्री होणार नाही याचीदेखील काळजी मी घेईन. त्याचबरोबर शरद पवारांबद्दल चुकून कुणी बोललं तर त्यांनी या सभागृहावर डोक्यावर घेताना सुद्धा बघितलं आहे. या सभागृहात येणारा पहिला नेता कोण असेल तर अजित दादा असायचे, सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सर्वात शेवटी जाणारे नेता देखील अजित दादा असायचे.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा