• Fri. Mar 6th, 2026

    Rohit Pawar : अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, संपूर्ण सभागृह सुन्न

    Rohit Pawar : अजित पवारांच्या शोक प्रस्तावावर बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, संपूर्ण सभागृह सुन्न

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दलच्या शोक प्रस्तावावर बोलतना आमदार रोहित पवार हे प्रचंड भावूक झाले. अजित पवार यांनी आपल्याला राजकीय उंची वाढवण्याचा सल्ला दिला होता, अशी आठवण रोहित पवारांनी यावेळी सांगितली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. या शोकप्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार भावूक झाले. शोक प्रस्तावावर बोलत असताना रोहित पवार यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. त्यांचा आवाज कापरा झाला. ते प्रचंड भावूक झाले. त्यांचं शोकप्रस्तावावरच्या भाषणाने सभागृहात प्रत्येक सदस्याला भावूक केलं.

    “प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जातीधर्माच्या पलिकडे काम करणारा नेता गेला. सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला. सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात आणि सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. बेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला. महाराष्ट्रातील राजकारणातला रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला, राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजित दादा पवार नावाचा जादूगार हसवत-हसवत संबंध महाराष्ट्राला निशब्द करुन गेला”, असं रोहित पवार म्हणाले.

    ‘अजित दादा म्हणायचे, शारीरिक वजन कमी कर अन् राजकीय वजन वाढव’

    “मला ते म्हणायाचे, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्या आहेत, झिपऱ्या कमी कर. त्या दिवशी एक आदरांजली मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे, तुझं शारीरिक वजन वाढलं आहे. ते शारीरिक वजन कमी कर. राजकीय वजन वाढव. मी नुसतं म्हणायचो, हो करतो. पण मी त्यांना शब्द देतो, माझी हेअर स्टाईल अशीच ठेवेन. शारीरिक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन, पण एक गोष्ट मात्र खरी, वरचं बटन वरपर्यंत लावत जा. मला काकांना एक सांगायचं आहे, 40-50 वर्षांनी मी जेव्हा तुम्हाला भेटेने तोपर्यंत मी हे बटन असंच उघडं ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यावर लावेन. हे बटन असं ठेवल्यावर तुमची आठवण मला येईल”, असं म्हणत असताना रोहित पवार यांना रडू कोसळलं.

    “40-50 वर्षींनी जेव्हा अजित काकांची भेट होईल, मी जो लढा लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताठ मानेने उभा राहीन. माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरका. या गोष्टी ऐकण्यासाठी हा छोटासा आणि महत्त्वाचा लढा सर्वांनी हातात घेतला आहे. तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. दादांच्या अपघाताला जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय, शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला तरी आम्ही घाबरणार नाही”, असं रोहित पवार म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा