• Mon. Mar 16th, 2026
    Central Railway: मध्य रेल्वेची मोठी कारवाई! वाठारमध्ये ‘तत्काळ’चा काळाबाजार उघड, दोघांना रंगेहाथ पकडलं

    Tatkal Ticket Booking Fraud: ​​या आरोपींच्या मोबाइलमध्ये ६० हजार रुपयांची तत्काळ सक्रिय रेल्वेची आरक्षित तिकिटे आढळली; तसेच अनेक दिवसांपासून तिकिटाचा काळाबाजार सुरू असल्याचे आढळले.

    तत्काळ रेल्वे तिकिट बुकिंग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: तत्काळ तिकीट काढण्यासाठी सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. मात्र, अनेकदा वेबसाइट स्लो होणे, काही मिनिटांतच सर्व तिकिटे संपणे असे प्रकार पाहण्यास मिळतात. यामागे अशा तिकिटांचा ‘तत्काळ’ काळाबाजार करणारे कार्यरत असल्याचे समोर आले असून, मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने पुणे विभागातील वाठार रेल्वे स्थानकावर दोन व्यक्तींना गुरुवारी रंगेहात पकडले.

    पुणे रेल्वे विभागातील सातारा जिल्ह्यात वाठार रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी तत्काळ तिकिटाचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी सापळा रचून दोघांना तत्काळ तिकीट काढत असताना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ते बऱ्याच दिवसांपासून अवैध मार्गाने तत्काळ तिकिटे काढून चढ्या दराने विक्री करीत असल्याचे दिसून आले.

    Maharashtra TimesPune News : पुण्यातील वाहतूक कोंडीवर उतारा, दोन उड्डाणपूल पाडण्याची शक्यता, दादांसोबत बैठकीत झालेली चर्चा
    दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या मोबाइलचा तपास केला असता त्यांच्याकडे ६० हजार रुपये किमतीची सक्रिय असलेली आरक्षित तत्काळ तिकिटे असल्याचे दिसून आले; तसेच काही दिवसांमध्ये त्यांनी एक लाख रुपयांची तिकीट विक्री केल्याचे दिसून आले आहे. हे आरोपी केवळ आजच्या कारवाईतच नव्हे, तर बऱ्याच काळापासून रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराच्या अवैध धंद्यात सक्रियपणे सामील होते. त्यांनी अनेक प्रवाशांना तत्काळ तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, रेल्वे प्रशासनातील कोणाचा सहभाग आहे का याचादेखील तपास सुरू आहे.
    Maharashtra TimesAmol Kolhe : ‘अजित दादा म्हणाले होते, छगन भुजबळ राज्यसभेवर जातील’, अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट
    कडक कारवाई आवश्यक
    रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणणे, संशयास्पद आयडींची तपासणी करणे आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. वाठार स्थानकावरील कारवाईमुळे तत्काळ तिकिटांच्या काळाबाजाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

    Maharashtra TimesPune News : शाळेत सोडण्याचा बहाणा, पुण्यात अल्पवयीन मुलीवर फॅमिली फ्रेण्डचा अत्याचार, डीपी रोडला कार थांबवली अन्…
    प्रवाशांच्या दृष्टिकोनातून प्रश्नचिन्हे
    दक्षता पथकाने केलेली कारवाई महत्त्वाची असली, तरी काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तत्काळ तिकिटे सर्वसामान्य प्रवाशांना उपलब्ध का होत नाहीत?, ऑनलाइन बुकिंग प्रणालीतील त्रुटींचा गैरफायदा घेतला जातो का?, एजंटांच्या माध्यमातून ‘ब्लॉक बुकिंग’ रोखण्यासाठी आणखी कडक यंत्रणा आवश्यक आहे का?, रेल्वे प्रशासनाने स्थानिक स्तरावर नियमित गुप्त तपासणी का केली जात नाही. तत्काळ तिकीट काढण्याच्या वेळेला वेबसाइट स्लो होणे, काही मिनिटांत तिकिटे संपणे आणि नंतर एजंटांकडे तीच तिकिटे जादा दराने उपलब्ध होणे ही बाब संशयास्पद आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला असला, तरी अशी कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा