• Tue. Jun 9th, 2026
    Rohit Pawar Letter to PM Modi :  ‘केंद्रीय मंत्री नायडूंचा तात्काळ राजीनामा घ्या’, रोहित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवरुन पंतप्रधान मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेल्या २८ जानेवारीच्या विमान अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांना पदावरून हटवावे आणि त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी लक्ष घातले पाहिजे, अशीही त्यांनी विनंती केली.

    रोहित पवार यांनी शनिवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जनपथावरील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दावा केला की, अपघातग्रस्त लिअरजेट ४५ विमानाच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हीएसआर विमान कंपनीशी मंत्री नायडू यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्या कंपनीला वाचविण्याचे प्रयत्न केंद्रातील वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. या अपघाताची स्वतंत्र आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी.

    रोहित पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, तुम्ही (पंतप्रधान मोदी) नेहमीच अजितदादा आणि देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल आदर दाखवला आहे. त्यामुळेच या अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्री नायडू यांना त्यांच्या पदावरून राजीनामा देण्यास सांगण्यात यावे. व्हीएसआर प्रकरणात डीजीसीएवर कोणत्याही प्रकारे प्रभाव पडला नाही याची खात्री करण्यासाठी हे आवश्यक आहे.

    विमान अपघाताशी संबंधित विविध मुद्दे अधोरेखित करताना हा घातपात झाल्याचा संशय पुन्हा व्यक्त करून रोहित पवार म्हणाले की, व्हीएसआर कंपनीला वाचवले जात आहे. कारण या कंपनीला एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे नायडू यांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे. या प्रकरणी आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितले. पण त्याला ते सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. पण आपल्याला ट्रोल करून धमक्या मिळत आहेत. सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही. पण भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट ऑथोरिटीच्या माध्यमातून या अपघाताची माहिती सहज मिळते, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

    आमदार रोहित पवार म्हणाले की, या अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये विमान हवेतच एका बाजूला झुकल्याचे दिसत आहे. ब्लॅक बॉक्सबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताच्या वेळी फक्त एकच नव्हे तर अनेक स्फोट झाले होते. विमानात सामान ठेवण्याच्या जागी पेट्रोल कॅन ठेवले होते, ज्यामुळे आग आणखी भडकली. या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली पाहिजे. यात दोन प्रकारचा कट असू शकतो- राजकीय किंवा व्यावसायिक, असेही रोहित पवार म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा