बहिणीच्या धाडसामुळे दोन चिमुकल्या मुलांची भिक्षेच्या जोखडातून सुटका झाली आहे. तिच्या धाडसाचं आणि दाखवलेल्या धैर्याचं कौतुक होत आहे. तिची भावंडं ही अवघ्या सात आणि आठ वर्षांची आहे. त्यांची जबाबदारी आता प्रशासनाने घेतली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : रक्ताच्या नात्याची ओढ आणि एका अल्पवयीन बहिणीच्या विलक्षण धाडसामुळे दोन चिमुकल्यांचे आयुष्य काळोखातून प्रकाशाकडे वळले आहे. नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरात पुलाखाली अत्यंत असुरक्षित अवस्थेत राहणाऱ्या दोन लहान भावांची प्रशासनाने यशस्वीरीत्या सुटका केली. सरिता (नाव बदलले) १४ वर्षांची असताना जिल्हा बालसंरक्षण विभागाने रेल्वे स्थानक परिसरातून तिची सुटका करून बालगृहात दाखल केले. तिला शाळेत दाखल केले असून एका ध्येयाने ती आपले शिक्षण पूर्ण करीत आहे. सध्या ती १९ वर्षांची असून शासनाच्या आधारगृहात राहत आहे. या मोठ्या बहिणीला आपल्या भावांच्या हालअपेष्टांची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रशासनाकडे धाव घेतली.
वडिलांचे निधन झालेले असून आई व्यसनाधीन आहे. आईने दुसरे लग्न करून संत्रा मार्केट परिसरातील फुटपाथवर संसार थाटला होता. तेथे दोन्ही लहान मुले भीक मागत आणि असुरक्षित वातावरणात दिवस कंठत असल्याची बाब बहिणीच्या लक्षात आली. या मुलीने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधून भावांची व्यथा मांडली. घटनेची गंभीरता लक्षात घेत सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ संयुक्त विशेष पथक तयार करण्यात आले.
सामाजिक सुरक्षा विभाग आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या मदतीने संत्रा मार्केट पुलाखाली शोध मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर एक ८ वर्षांचा आणि एक ७ वर्षांचा अशा दोन्ही चिमुकल्यांना सुखरूप ताब्यात घेऊन तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या दोन्ही भावांना सुरक्षित बालगृहात दाखल करण्यात आले असून त्यांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली आहे.
या मोहिमेत पठाण यांच्यासह संरक्षण अधिकारी साधना हटवार, सामाजिक सुरक्षा विभागाचे दीपक झाडे, लता गवई, संजय सोनवणे, चाईल्ड हेल्पलाइनचे मीनाक्षी धडाडे, अनिकेत भिवगडे, रोशनी मेश्राम तसेच संस्था प्रतिनिधी प्रियंका होटे आणि अश्विनी चोरे यांनी सहभाग घेतला. एका बहिणीच्या प्रेमाने आणि प्रशासनाच्या तत्परतेने दोन निष्पाप बालकांना फुटपाथवरील नरकयातनांतून बाहेर काढून सुरक्षित भविष्य मिळाले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा