• Wed. Mar 11th, 2026

    Nashik Crime: नाशिकमधील तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले; प्रियकराकडून चालत्या गाडीत चाकूने वार, कारणही झालं उघड!

    Nashik Crime: नाशिकमधील तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले; प्रियकराकडून चालत्या गाडीत चाकूने वार, कारणही झालं उघड!

    Nashik Murder Case: अथर्वने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रेयसीला सोबत नेले व चालत्या वाहनात तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. तसंच नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तरुणीचा मृतदेह नाशिकमधील एका परिसरात फेकून दिला.

    नाशिकमधील तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले; प्रियकराकडून चालत्या गाडीत चाकूने वार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारूळ शिवारात आढळलेल्या अनोळखी तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. चारित्र्याच्या संशयावरून तिच्याच एका मित्राने दोन साथीदारांच्या मदतीने चालत्या गाडीत चाकूने वार करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झालं असून, मुख्य आरोपीसह अन्य एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी सारूळ शिवारातील निर्जनस्थळी एका १६ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. वाडीवऱ्हे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका बेपत्ता मुलीच्या तक्रारीवरून मृताची ओळख पटली असून मयत तरुणी मूळची बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचं निष्पण्ण झालं आहे.

    सदर तरुणी अकोला येथे शिक्षण घेत होती. तिचा कौटुंबिक मित्र असलेल्या अथर्व गजाननराव देशमुख (वय १९, रा. दुसरबीड) याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, ती इतर मुलांशी बोलते या संशयाने अथर्वच्या मनात राग होता. याच रागातून अथर्वने आपल्या साथीदारांच्या मदतीने तिला सोबत नेले आणि चालत्या वाहनात तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह नाशिकमधील सारूळ परिसरात फेकून दिला.

    तांत्रिक माहितीच्या आधारे, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सापळा रचून संशयित आरोपी अथर्व देशमुख याला सातपूर कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सध्या नाशिक पोलिस घेत आहेत. अवघ्या काही तासांत नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लाऊन मुख्य संशयित याला ताब्यात घेतल्याने त्यांच्या या कामगिरीचे कौतुक देखील होत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा