• Sun. Mar 8th, 2026
    Nagpur News : नागपूरच्या ‘अजब’ बंगल्याचे होणार नूतनीकरण, सरकारकडून 60 कोटी मंजूर, या बंगल्याची विशेषत: काय?

    नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय अर्थात ‘अजब’ बंगल्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी निधी मंजूर केला आहे. त्या अंतर्गत सध्या बंद असलेल्या आठ दालनांची दुरुस्ती करून त्याला नव्या स्वरूपात आणण्याचे काम सुरू होणार आहे. येत्या महिनाभरात याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : महाराष्ट्रात सध्या विविध विषयांवरील १३२ संग्रहालये आहेत. यात व्यक्ती, विविध विषय आणि विविध विचार, कलादालने असे मुख्य प्रकार आहेत. पुरातत्त्व आणि इतिहास या विषयावर आधारित नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालय प्रसिद्ध आहेत. मध्यवर्ती संग्रहालयाची स्थापना १८६३ मध्ये झाली. यामध्ये प्रदर्शनीय वस्तूंची संख्या २८ हजार ८८७ इतकी आहे. या संग्रहालयाची विभागणी ऐतिहासिक अवशेष, कला-व्यवसाय, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, निसर्ग, इतिहास अशी करण्यात आली आहे. येथे एकूण अकरा दालन आहेत. त्यातील तीन दालन सध्या खुली असून आठ दालन बंद आहेत.

    कोरीव कामाच्या विविध वस्तू, ब्रह्मदेशातील कलाकृती, प्रागैतिहासिक ते आजपर्यंतच्या इतिहासाचा उलगडा करणारे पुरावशेष, देवटेक येथील अशोकाचा शिलालेख, नष्ट झालेल्या प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष, भूगर्भातील रहस्यांचा उलगडा करणारे नमुने या सर्व वस्तू संग्रहालयात आहेत. मात्र, बहुतांश दालन बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. अशात येथील नूतनीकरणासाठी हालचाली करण्यात आल्या. त्याला यश मिळाले असून राज्य सरकारने यासाठी ६० कोटी निधी देऊ केला आहे.

    याबाबत अधिक सांगताना संग्रहालयाचे अभिरक्षक मयुरेश खडके म्हणाले, ‘पाणी गळतीमुळे संग्रहालयातील काही दालन बंद आहेत. या दालनांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. येत्या महिनाभराच्या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी प्रमाणित असलेल्या मानकानुरूप काम पूर्ण होईल. हे संग्रहालय ब्रिटीशकालीन आहे. संग्रहालयाची विशेषता लक्षात घेत त्याचे नूतनीकरण होईल.’ प्राप्त माहितीनुसार, एकाचवेळी सर्व दालनांचे काम हाती न घेता टप्प्याटप्प्याने काम सुरू होईल. पर्यटकांना या ऐतिहासिक ठेवा उत्तम वातावरणात अनुभवता यावा, याकडे लक्ष राहणार आहे.

    तीन वर्षांपासून काही भाग बंद

    प्राप्त माहितीनुसार, अजब बंगल्यातील आठ दालन ऑगस्ट २०२३ पासून बंद आहेत. पाणी गळती आणि इतर कारणांमुळे प्रशासनाने दुरुस्ती तसेच नूतनीकरणासाठी हे दालन बंद केलेत. सातत्याने पाठपुरावा करूनही निधी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे अद्याप आठही दालनांचे काम सुरू झालेले नाही. बराचसा भाग बंद असल्याने पर्यटक येथील ऐतिहासिक वारसा अनुभवू शकत नाहीत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा