Bhigwan Kidnapping Case: गोपीचंद पडळकर यांनीही आज सांगली इथं बोलताना नाव न घेता आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला आहे. आरोपींना इतकी मस्ती कुठून येते, असं म्हणत पडळकर यांनी राहुल कुल यांच्याशी संबंधित व्हॉट्सअॅप स्टेटस मीडियासमोर दाखवले.
“आमदार राहुल कुल हे आरोपींना मदत करत आहेत. मी पण तुमच्याच तालुक्यातली आहे. पण मला भेटायला यावं, असं राहुल कुल यांना वाटलं नाही. माझी मुलगी परत यावी यासाठी आता इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे यांनी मला मदत करावी,” असं भिगवणमधील तरुणीच्या आईने म्हटलं आहे.
आरोपीच्या कुटुंबीयांना राजकीय मदत?
भिगवण येथील तरुणीच्या आईने आपल्या मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानंतर सदर तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. मी माझ्या मर्जीने जहीर शेख याच्यासोबत निघून आल्याचं तिने या व्हिडिओतून सांगितलं होतं. पण तरुण-तरुणी फरार असताना असे व्हिडिओ पोलिसांपर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याची आरोपींची हिंमत होते, याचा अर्थ या आरोपींच्या मागे कोणतीतरी राजकीय ताकद उभी असल्याचा आरोप भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. आरोपीचा तरुणाचा नातेवाईक असलेल्या अजहर शेख याने आज राहुल कुल यांचा फोटो स्टेटसवर ठेवून ‘सदैव एकनिष्ठ’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी सांगली इथं बोलताना या आरोपींना इतकी मस्ती कुठून येते, असं म्हणत थेट अजहर शेख याचे व्हॉट्सअॅप स्टेटस मीडियासमोर दाखवत नाव न घेता आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता तरुणीच्या आईनेही आमदार राहुल कुल यांचे नाव घेतल्याने ते वादात सापडले आहेत.
दरम्यान, भिगवण प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याने हा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांबाबत अद्याप राहुल कुल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ते याबाबत आपली बाजू कशा पद्धतीने मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
