• Sun. Mar 8th, 2026
    Bhiwandi Mayor: भिवंडी महापौरपदाची उत्सुकता शिगेला! आज होणार मतदान; संपूर्ण राज्याचे लक्ष

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपकडून महापौरपदाचे दावेदार असलेले नाराज नारायण चौधरी भिवंडी सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याच्या चर्चेने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये फूट पडल्याची चर्चा असली तरी चौधरी यांच्यासोबत किती नगरसेवक आहेत हे गुलदस्त्यात असून, फ्रंटमधील काँग्रेसचे मोमीन तारिक अब्दुल बारी महापौरपदाच्या रिंगणात आहेत.

    महापौरपदासाठी नऊ, तर उपमहापौरपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून मोमीन तारिक अब्दुल बारी महापौरपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी उपमहापौरपदासाठीही उमेदवारी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडली असून, शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

    Bhiwandi Politics: काँग्रेसकडून चंद्रपूरचा बदला? भाजपमध्ये मोठी फूट, ‘सेक्युलर फ्रंट’शी घरोबा; समीकरणं फिरली
    शिवसेनेकडून महापौरपदासाठी बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर, भाजपकडून स्नेहा पाटील यांच्यासह नारायण चौधरी रिंगणात उतरले होते. मात्र, पक्षाने पाटील यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्याने चौधरी नाराज झाले. चौधरी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी-शपच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटशी घरोबा केल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या भिवंडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे मिळून एकूण ४२ नगरसेवक होतात. समाजवादी पक्षाचे नगरसेवक फ्रंटमध्ये सहभागी न झाल्याने काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने बहुमतासाठी अन्य एका आघाडीची मदत घेण्याबाबत चर्चा सुरू केली. मात्र, त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. मात्र, फ्रंटकडून प्रत्यक्षात महापौरपदाचा नेमका उमेदवार कोण याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Politics: मोठी उलथापालथ! भाजपला झटका, नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा; सत्ता पेच सुटला, समीकरणं फिरली
    फसवणुकीच्या प्रकरणात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक केलेले कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांनीही महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची पत्नी आणि मुलगाही रिंगणात आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले विलास पाटील यांना महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. कोणार्क विकास आघाडीसोबत एक अपक्ष नगरेसवक असल्याने ही आघाडी कुणासोबत जाणार हेही अद्याप स्पष्ट नाही. भिवंडी विकास आघाडीचे माजी महापौर जावेद दळवी महापौरपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी उपमहापौरपदासाठीही अर्ज दाखल केला आहे. समाजवादी पक्षाचे नगरेसवक कुणाच्या बाजूने आहेत, हे गूढ उकललेले नाही.

    Maharashtra TimesAmruta Fadnavis: मॅनेजमेंट ट्रेनी ते SVP; अमृता फडणवीस यांचा राजीनामा; ॲक्सिस बँकेचा निरोप घेताना गहिवरल्या
    पक्षीय संख्याबळ
    काँग्रेस ३०
    कोणार्क विकास आघाडी ४
    भाजप २२
    भिवंडी विकास आघाडी ३
    शिवसेना १२
    राष्ट्रवादी (शप) १२
    अपक्ष १
    समाजवादी पक्ष ६
    बहुमताचा आकडा ४६

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed