• Thu. Jun 11th, 2026

    हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल – हिलरी क्लिंटन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 18, 2026
    हवामान बदलाच्या लढ्यात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल – हिलरी क्लिंटन – महासंवाद

    Oplus_131072

    मुंबई, दि. १८ : हवामान बदलाच्या लढ्यात युवक, महिला आणि स्थानिक समुदाय यांच्या कल्पना व कृती निर्णायक ठरणार असून दरवाजे ठोठावत राहा, आवाज बुलंद ठेवा आणि उपाय मांडत राहा, असा स्पष्ट संदेश अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी दिला.

    मुंबई क्लायमेट वीकमधील फायरसाइड चर्चेत त्या बोलत होत्या. श्लोका नाथ यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित होत्या.

    हवामान बदलात भारत नवकल्पना व अंमलबजावणीचे नेतृत्व करेल – हिलरी क्लिंटन

    हवामान बदलाच्या लढ्यातील आघाडीवर भारत आणि दक्षिणेकडील देश नवकल्पनांचे नेतृत्व करू शकतात. पर्यावरणासाठी आणि मानव जातीच्या कल्याणासाठी परिणामकारक उपायांकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यात भारताचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी केवळ चर्चा नकोत, तर कृती करणे, हीच खरी काळाची गरज आहे, असे क्लिंटन यांनी यावेळी नमूद केले.

    पर्यावरण कृती ही केवळ धोरणांची नव्हे, तर राजकारण, बाजारपेठ आणि उद्योग यांच्या वास्तवाची जाण ठेऊन पुढे नेण्याची प्रक्रिया असल्याचे श्रीमती क्लिंटन यांनी नमूद केले. दक्षिणेकडील देशातील युवकांकडे स्थानिक पातळीवरील प्रभावी उपाय आहेत; मात्र त्यांना भांडवल, नेटवर्क आणि व्यासपीठाची कमतरता भासते. कल्पना कुठूनही येऊ शकतात, फक्त त्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे. सार्वजनिक, खासगी आणि सामाजित उत्तरदायित्व क्षेत्रांनी एकत्र येऊन अंमलबजावणीसाठी सक्षम भागीदारी उभी करणे ही काळाची गरज आहे. यासाठी  क्लिन्टन ग्लोबल इनिशिएटीव्ह वर्षभर भागीदारांसोबत काम करून निधी, तांत्रिक मदत आणि अंमलबजावणीची साखळी उभी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

    हवामान, आरोग्य आणि त्याचे विशेषतः महिलांवर होणारे परिणाम, हे परस्परांशी जोडलेले असून विशेषतः उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो, असे त्यांनी नमूद केले.

    भारतातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांसोबत काम करताना हवामान बदलाचा प्रत्यक्ष परिणाम दिसल्याचा उल्लेख करत क्लिंटन यांनी सेल्फ एम्प्लॉईड असोसिएशन (सेवा) सोबतच्या उपक्रमाचे उदाहरण दिले. अत्यंत उष्णतेमुळे कामाचे तास कमी होऊन महिलांचे उत्पन्न घटते. यासाठी हवामान-संवेदनशील विमा मॉडेल विकसित करण्यात आले असून सध्या भारतात पाच लाख महिला या संरक्षणाखाली आल्या आहेत. हा नमुना पुढे इतर देशांत राबवण्याचा मानस आहे, असे क्लिंटन यांनी सांगितले.

    हवामान बदल हा केवळ पर्यावरणीय नव्हे, तर आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्न असून स्वच्छ ऊर्जा, अनुकूलन उपाय आणि स्थानिक पातळीवरील नवकल्पनांवर भर द्यावा. जागतिक समस्या असली तरी उपाय स्थानिक पातळीवरच सुरू होतात, असेही त्या म्हणाल्या.

    पर्यावरण संवर्धनाविषयी त्यांनी निसर्गाशी असलेले मानवी नाते अधोरेखित केले. समुद्र, डोंगर, नद्या आपण तयार केल्या नाहीत. त्यामुळे या पृथ्वीचे वारसदार आहोत; तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी युवकांना नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले.

    हवामान बदल म्हणजे धोरणाचा नव्हे, तर आरोग्याचाही प्रश्न

    हवामान बदल हा केवळ ऊर्जा धोरणाचा मुद्दा नसून तो सार्वजनिक आरोग्या संदर्भातीलही गंभीर विषय आहे, असे क्लिंटन यांनी स्पष्ट केले. दिल्ली, बीजिंगसारख्या शहरांतील प्रदूषण, महिलां व मुलांमधील श्वसनविकार यांचा उल्लेख करत त्यांनी स्वच्छ इंधन व पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या प्रसाराची गरज मांडली. अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांसह चीन, भारतासारख्या देशांनीही अक्षय ऊर्जेकडे संपूर्ण संक्रमण करणे आवश्यक आहे.

    एआय क्रांती आणि पर्यावरणीय परिणाम

    एआय तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पूर व्यवस्थापन, शेतीक्षमता वाढविणे यासाठी उपयुक्त ठरू शकते; मात्र येणाऱ्या काळात एआयमुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल घडतील. लाखो लोक विस्थापित होऊ शकतात. त्यामुळे सरकारांनी आतापासूनच याबाबत नियमन व धोरणात्मक तयारी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाच्या अनियंत्रित विस्तारातून घेतलेला धडा लक्षात घेऊन, एआयसंदर्भात उशीर होण्यापूर्वीच योग्य पावले उचलावीत, असा सल्ला त्यांनी दिला.

    ०००

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed