• Fri. Mar 6th, 2026
    Kirit Somaiya: नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

    Kirit Somaiya On Fake Birth Certificate: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शहरात १८ हजार बनावट जन्मदाखले दिल्याचा दावा करतानाच त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.

    किरीट सोमय्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: मालेगाव प्रमाणेच नाशिकमध्येही बोगस जन्म दाखल्यांचा घोटाळा झाला असून, असे तब्बल १८ हजार जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महापौरांसह महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधीक्षकांकडे केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. राज्यात वर्षभरात २ लाख ३३ हजार जन्मप्रमाणपत्र नोंदी रद्द करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

    मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच नाशिक महापालिका क्षेत्रातही बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्मप्रमाणपत्रे देण्यात आल्याचा संशय असल्यामुळे सोमय्या यांनी सोमवारी (दि. १६) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, पोलिस अधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर नाशिकमध्येही जन्मप्रमाण पत्र नोंदणीत घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. शेख नायरा नूर मोहम्मद यांचा बोगस जन्मदाखला पुराव्यानिशी सादर केला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

    Maharashtra TimesNashik Accident: मद्यधुंद रुग्णवाहिका चालकाचा प्रताप; समोरुन येणाऱ्या कारला ठोकलं, दोनजण गंभीर जखमी
    मालेगावमध्ये तीन हजार ९७७ खोटे जन्मदाखले असून, त्याप्रकरणी चार गुन्हे दाखल केल्याचे सांगतानाच एक हजार लोकांना आरोपी केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला. कुठलाही बांगलादेश रोहिंग्या, अफगाणिस्तानच्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही, असेही ते म्हणाले. आपण महिनाभरात २५ महापालिकांना भेटणार असल्याचे सोमय्या या वेळी म्हणाले.

    तत्काळ चौकशी करुन आठ दिवसांत अहवाल
    महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातून बनावट जन्म दाखल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली. सातपूर विभागीय कार्यालयातून एका महिलेला बनावट जन्म दाखला दिल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेकडूनही चौकशी सुरू केल्याचे हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले. यासदंर्भात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास जन्म-मृत्यू दाखला देणारे कर्मचारी व दाखल्यावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesNashik Crime: परीक्षेला जाताना विद्यार्थिनीचा विनयभंग; नाशकात रोडरोमियोचा संतापजनक प्रकार, भररस्त्यात छेडछाड
    पत्रकारांवरच चीडचीड
    मुबंई रेल्वे स्टेशनजवळ ८० टक्के फेरीवाले बांगलादेशी, मुस्लिम माफिया आहेत, तर त्यावर गृहविभागाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे समर्पक उत्तर नसल्याने आपला काही ‘वन पॉइंट प्रोग्राम’ आहे का, असा प्रश्न विचारत त्यांनी पत्रकारांशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. ११ वर्षांत कित बांगलादेशींना देशाबाहेर काढले, हे विचारल्यानंतर सोमय्यांची चीडचीड वाढली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देणे हा परराष्ट्र धोरणाचा भाग असल्याचा दावा केला. आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे सांगत, त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा