यवतमाळ
राज्यात घातपाती कारवाया घडविण्याचा कट रचला जात असल्याच्या संशयावरुन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी मध्यरात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात मोठी कारवाई सुरु केली. पुसद आणि उमरखेड शहरांत 20 एटीएस पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या कारवायांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. उमरखेड येथील ताजपुरा वॉर्ड परिसरातील एका संशयिताच्या घराची शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएस पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने तपासणी केली. स्थानिक पोलीस विभागही या कारवायांपासून अनभिज्ञ होते. केवळ बंदोबस्त हा स्थानिक पोलिसांचा होता. कारवाई काय झाली हे गोपनीय ठेवण्यात आले आहे.
संशयिताच्या घरी तपास सुरु
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ताजपुरा वॉर्डातील एका घराजवळ पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली. काही वेळाने नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली. पोलिसांनी एका संशयिताच्या घरी तपास सुरु करताच सदर तपासणी दहशतवादीविरोधी पथकाची असल्याचे समजले. रविवारी सकाळपर्यंत सदर पथकाची चौकशी सुरु होती.
तरुणांच्या ‘ब्रेनवॉशिंग’चा संशय
पुसद शहरातही एटीएसच्या पथकाने शोध मोहीम सुरु केली आहे. शहरातील वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पार्वतीनगर परिसरातील तरुणाचा ‘ब्रेनवॉशिंग’ करुण राज्यात घातपाती कारवाया घडवण्याचा कट रचल्याच्या संशयावरुन एटीएसने शनिवारी मध्यरात्रीपासून धडक कारवाई केल्याने शहरात एकच कारवाई केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यातील तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करुन त्यांना दहशतवादी संघटनांकडे आकर्षित केले जात असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. या आधारे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वातील विशेष पथकांनी शनिवारी मध्यरात्री पुसद शहरात 11 ठिकाणी शोधमोहीम राबविली. यात डझनाहून अधिक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ही मोहीम अत्यंत गोपनीय ठेवल्याने या कारवायांची स्थानिक पोलिसांनाही कल्पना नव्हती. कारावाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
संशतियांच्या संबंधांचा तपास सुरु
राज्यातील तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून त्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करीत त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. संशयितांचे काही आंतरराष्ट्रीय किंवा आंरराज्य दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत का? याचाही तपास सुरु आहे. जप्त लॅपटॉप आणि मोबाइलमधून मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. एटीएसने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. अद्याप कुणालाही रीतसर अटक केलेली नाही. आक्षेपार्ह साहित्य आणि तांत्रिक पुराव्यांआधारे पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांकडून मिळाली आहे.