• Sat. Jun 6th, 2026

    Ahilyanagar ATS Action : अहिल्यानगरात एटीएसची मध्यरात्री मोठी मोहीम; मुकुंदनगरसह राज्यात अनेक जिल्ह्यांत छापे

    Ahilyanagar ATS Action : अहिल्यानगरात एटीएसची मध्यरात्री मोठी मोहीम; मुकुंदनगरसह राज्यात अनेक जिल्ह्यांत छापे

    अहिल्यानगरमध्ये दहशतवादविरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुकुंदनगर परिसरात एकाच वेळी सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून म्हणजेच Anti-Terrorism Squad (ATS) कडून काल मध्यरात्रीपासून राज्यभर मोठी समन्वित कारवाई सुरू करण्यात आली आहे. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात सात ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविण्यात येत आहे. पहाटेपर्यंत चौकशी सुरू होती. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी अनेक संशयितांची गुप्त चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एटीएसला मिळालेल्या गोपनीय सूचनेच्या आधारे ही धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुकुंदनगर परिसरातील काही घरांवर मध्यरात्री छापे टाकण्यात आले. अचानक मोठ्या संख्येने पोलीस आणि एटीएस अधिकारी पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस दलाच्या बंदोबस्तात ही कारवाई पार पडली.

    एटीएसच्या पथकांनी केवळ अहिल्यानगरमध्येच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यांत एकूण २१ ठिकाणी एकाचवेळी कारवाई केल्याचे समोर आले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तसेच अकोला जिल्ह्यातील उमरखेड भागातही छापे टाकण्यात आले. या सर्व कारवाया समन्वयाने आणि नियोजनपूर्वक राबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

    दहशतवादी कनेक्शनच्या अनुषंगाने तपास जारी

    या कारवाईमागे नेमके कारण काय? कोणत्या संघटनेशी किंवा नेटवर्कशी संबंधित तपास सुरू आहे? याबाबत एटीएसकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, संशयित हालचाली, आर्थिक व्यवहार किंवा संभाव्य दहशतवादी कनेक्शन या अनुषंगाने तपास सुरू असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही व्यक्तींचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून काहींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. अनेकांना चौकशीसाठी नोटीस दिली आहे का? याबाबतही अधिकृत पुष्टी नाही.

    अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन

    मुकुंदनगरमध्ये अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहलाचे वातावरण आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या हालचालींमुळे परिसरात अफवांना उधाण आले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमागील नेमका उद्देश काय? कोणत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पुढील टप्प्यात अटक होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एटीएसकडून अधिकृत खुलासा झाल्यानंतरच या गूढ छाप्यांचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुकुंदनगरमध्ये सुरू असलेली एटीएसची कारवाई अजूनही गुप्त ठेवण्यात आली असून पुढील काही दिवसांत मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा