• Wed. Jun 17th, 2026

    खारघर येथे गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम, विविध उपक्रमांमधून व्यापक जनजागृती करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 13, 2026
    खारघर येथे गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम, विविध उपक्रमांमधून व्यापक जनजागृती करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील – महासंवाद

    ठाणे, दि.13 (जिमाका) : ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी दिल्या.

    या कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली.

    बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अधिकारी वैभव कुलकर्णी, तहसिलदार उमेश पाटील, माहिती अधिकारी प्रविण डोंगरदिवे यांच्यासह महसूल विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सिडको तसेच विविध महानगरपालिका व नगरपालिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार सर्व शासकीय विभागांनी केलेल्या प्रचार-प्रसिद्धीचा आढावा अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी यावेळी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी शिक्षण विभागाला शाळांमध्ये निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावर स्वच्छता मोहीम राबविणे, ग्रामपंचायतींमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे कार्यक्रमासंदर्भातील गीत प्रसारित करणे, तसेच प्रभात फेरीद्वारे जनजागृती करणे, अशा सूचना देण्यात आल्या.

    आरोग्य विभागाने शाळा व विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले.

    जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी यावेळी आरोग्य शिबिरांच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. तसेच सर्व विभागांनी कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी राबविलेल्या उपक्रमांची छायाचित्रे, व्हिडिओ व माहिती अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. नगरपालिका व महानगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील डिजिटल होर्डिंग्ज, बॅनर व अन्य माध्यमांतून कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करावी, असे निर्देश देण्यात आले.

    ठाणे जिल्हा व परिसरातून कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहतूक व निवास व्यवस्थेबाबतही आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

    000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed