• Tue. Jun 16th, 2026

    Nagpur News: शेतकऱ्यांच्या घामाचं ‘पांढरं सोनं’ जिनिंगमध्ये भस्मसात! भीषण आगीत 12 कोटींची राख, तब्बल 18 हजार क्विंटल कापूस जळून खाक

    Nagpur News: शेतकऱ्यांच्या घामाचं ‘पांढरं सोनं’ जिनिंगमध्ये भस्मसात! भीषण आगीत 12 कोटींची राख, तब्बल 18 हजार क्विंटल कापूस जळून खाक

    नागपूरच्या कुही तालुक्यातील कल्पना जिनिंग कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत १८ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून १२ कोटींचे नुकसान झाले आहे. या घटनेत एक बालक जखमी झाले असून

    नागपूर जिनिंग कारखान्याला आग, १२ कोटींचे नुकसान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेद्र खापरे, नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील कुही आंभोरा मार्गावरील भंडारबोडी परिसरातील कल्पना जिनिंग कारखान्यात गुरुवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीने केवळ आर्थिकच नव्हे तर औद्योगिक सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. सुमारे १८ हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून अंदाजे १२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आठ वर्षीय रोहन सुरेश दूधवे हा बालक भाजला असून त्याच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.

    नियंत्रण कक्षाला आग लागल्याची माहिती मिळताच कुही येथून दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. मात्र कारखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर साठवलेला कापूस आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. त्यानंतर मौदा व उमरेड येथील अग्निशमन पथकेही मदतीसाठी दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत धुराचे लोट आणि ज्वाळा दूरवरून दिसत होत्या.

    मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या वेळी कारखान्यात नियमित काम सुरू होते. अचानक धूर आणि ज्वाळा दिसताच कामगारांनी बाहेर पडण्याची धावपळ केली. परिसरातील काही नागरिकही त्या वेळी जवळ असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळात एका लहान मुलाला भाजल्याची घटना घडली. घटनेनंतर गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूकही थांबवण्यात आली.

    Maharashtra TimesThane Crime : ठाण्यातील प्रदर्शनातून चोरी, स्टॉल मालकिणीचा संताप, CCTV फूटेज शेअर करत म्हणाल्या, सुशिक्षित दिसणारी महिला…

    आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस साठवला असताना अग्निसुरक्षा उपाययोजना पुरेशा होत्या का, अग्निशामक यंत्रणा कार्यरत होती का, तसेच विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी झाली होती का, याबाबत प्रशासन चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानाचा पंचनामा सुरू असून कारखान्याच्या सुरक्षा मानकांची तपासणी केली जात आहे.

    दरम्यान, या दुर्घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि कापूस व्यापाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात कापूस जळाल्याने पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने मदत व नुकसानभरपाई प्रक्रियेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा