• Fri. Jun 19th, 2026

    खारघर येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था- जिल्हाधिकारी संतोष पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 13, 2026
    खारघर येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था- जिल्हाधिकारी संतोष पाटील – महासंवाद

    सातारा दि. 13 : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुुुर साहिबजी यांच्या ऐतिहासिक शहीदीला 350 वर्ष पूर्ण होत असून या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून खारघर, नवी मुंबई (रायगड) या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च या दिवशी ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

    1 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी मोहयाल, वाल्मिकी, उदासीन भगत नामदेव (वारकरी) या समाजातील नागरिकांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी या समाजातील नागरिकांना मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावे यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

    श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या नियोजनाबाबतची बैठक जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, ग्यानीजी सुशीलसिंह, या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय संघटक सचिन वालेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    ‘हिंद-दी-चादर’ हा कार्यक्रम खारघर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक उपस्थित रहावेत यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी वाहन उपलब्ध करुन द्यावीत. शहरात ठिक ठिकाणी होर्डींग, पोस्टर लावावेत. या कार्यक्रमानिमित्त शिक्षण विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, तसेच शाळेमध्ये डाक्युमेंट्री लावावी. तसेच प्राप्त झालेले श्री. सतींदर सरताज यांचे गीत वेळोवेळी लावावे.

    आरोग्य विभागाने तालुकास्तरावर आरोग्य शिबीर घ्यावेत. श्री. गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य पुढील पिढीला कळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर येथे 1 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिक कसे जातील यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed