• Fri. Mar 13th, 2026
    Jalgaon News: सॅटेलाइट पाहणीत जळगावात 44 हजार हेक्टरवरील बनावट केळी पीक विमा उघड; 37 कोटी जप्त, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

    जळगाव जिल्ह्यात सॅटॅलाइट पाहणीतून ४४ हजार हेक्टरवरील बनावट केळी पीक विमा घोटाळा उघड झाला आहे. प्रशासनाने २१७ कोटींचे संभाव्य नुकसान टाळले असून ३७ कोटींची रक्कम जप्त केली आहे.

    सॅटॅलाइट सर्वेक्षणात उघड झाला २१७ कोटींचा पीक विमा घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यात कोट्यावधी रुपयांचा पिक विमा लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यात 44 हजार हेक्टरवर बनावट केळी पीक विमा काढल्याचेही सॅटॅलाइट पाहणीत उघड झाले आहे. कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना बनावट पीक विमा बाबत प्राथमिक अहवाल केला सादर केला आहे. या अहवालामध्ये जिल्ह्यातील 44 हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची ३७ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी विभागाच्या निगडित सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीनंतर कृषी आयुक्तांची चर्चा करून कारवाईबाबत दिशा ठरवली जाईल, असं जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्पष्ट केलं आहे.

    नेमकं काय घडलं?

    जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत केळी लागवड नसलेल्या क्षेत्रावर पीक दाखवून मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज सादर केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक माहितीनुसार २५ हजारांहून अधिक अर्ज संशयास्पद असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.२०२५-२६ या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २७,२५९ अर्जांची वाढ नोंदवली गेली. सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली असल्याचे दाखवण्यात आले. अचानक झालेल्या या वाढीमुळे कृषी विभागाने उपग्रहाच्या माध्यमातून सखोल तपासणी केली असता चोपडा, मुक्ताईनगर, यावल आणि रावेर तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली. प्रत्यक्षात केळी लागवड नसताना अर्ज करणे, लागवड क्षेत्र जास्त दाखवणे, जिओ-टॅग छायाचित्रांमध्ये फेरफार करणे आणि इतरांच्या कागदपत्रांचा वापर करणे असे प्रकार समोर आले.

    या प्रकरणात विमा हप्त्याच्या स्वरूपात जमा झालेले सुमारे ३७ कोटी ४३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. वेळेत पडताळणी झाल्यामुळे राज्य सरकारचे १२३ कोटी ५३ लाख आणि केंद्र सरकारचे ९३ कोटी ५८ लाख, असे एकूण सुमारे २१७ कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. संबंधित बोगस अर्जदारांवर कठोर कारवाईचे संकेत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास रस्तोगी यांनी दिले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा