• Fri. Mar 6th, 2026

    Andheri Subway Flyover: मुंबईत रेल्वे पुलाखाली सबवे, नाल्यामुळे दर पावसाळ्यात मार्ग जलमय, आता पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल उभारणार; कसा-कुठे?

    Andheri Subway Flyover: मुंबईत रेल्वे पुलाखाली सबवे, नाल्यामुळे दर पावसाळ्यात मार्ग जलमय, आता पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल उभारणार; कसा-कुठे?

    Andheri Subway Waterlogging: अंधेरी सबवे पावसाळ्यात पाण्याखाली जातो. या समस्येवर तोडगा म्हणून महापालिका सबवेवरून उड्डाणपूल बांधणार आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक केली आहे. तीन महिन्यांत अहवाल सादर होईल.

    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पावसाळ्यात जलमय झालेला अंधेरी सबवे हे नेहमीचेच दृश्य. त्यामुळे उडणारा वाहतुकीचा बोजवारही सालाबादचाच. मात्र, आता हे चित्र बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या सबवेवर उड्डाणपूल उभारण्याचे ठरविले आहे. परंतु पूल उभारणी व्यवहार्य ठरेल किंवा कसे, याची चाचपणी करण्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नेमणूक केली आहे. सल्लागाराकडून तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाणार आहे.

    अंधेरीच्या सबवेला लागूनच मोगरा नाला वाहतो. उगम स्थळ ते अंधेरी सबवे हे अंतर अडीच किमीचे आहे. नाल्याच्या उगम स्थळापासून सबवेकडे येताना तब्बल १३ मीटरचा उतार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात येतो. भरतीच्या वेळी मोगरा नाल्याच्या पाण्याची पातळी वाढते. त्यालगत असलेल्या अंधेरी सबवे, दाऊद बाग, आझादनगर या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. परिणामी अंधेरी सबवेतील वाहतूक पूर्णपणे बंद होते.

    Maharashtra TimesMahim-Bandra Flyover: पश्चिम द्रुतगती मार्गावरील कोंडी फुटणार, खाडीवरील पुलामुळे दादर, खार, सांताक्रूझ प्रवाशांना दिलासा; पण तीन वर्षे पूल कागदावरच

    रेल्वे पुलाखालून सबवे

    त्यामुळे अंधेरी सबवेवरूनच उड्डाणपूल उभारणी करण्याचा पर्याय पूल विभाग, महापालिकेने निवडला आहे. वॉर्ड स्तरावरही याचे नियोजन होत आहे. मात्र, पूल उभारणीआधी त्याची व्यवहार्यता तपासली जाणार आहे. सबवेवरून पूल होऊ शकतो का, त्याची लांबी किती असावी, त्याचे बांधकाम करताना येणाऱ्या अडचणी, खर्च, पुलाचा फायदा, रेल्वे प्रशासनासह विविध परवानगी याचा व्यवहार्यता अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सबवे स्थानकानजीक आहे. गोखले पुलालगत असलेला हा मार्ग रेल्वेच्या पुलाखालून जातो. सबवे असला तरी हा भुयारी मार्ग नाही.

    ठाकरेंच्या नगरसेवकांना १ कोटी, चंद्रपुरातील युतीवरून संदीप देशपांडेंचा निशाणा

    मोगरा पंपिंग स्टेशनची प्रतीक्षा

    पुराचा धोका टाळण्यासाठी महापालिकेकडून मोगरा पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. मात्र, या पंपिंग स्टेशनसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मोगरा पंपिंग स्टेशन कामासाठी महापालिकेने कार्यादेश दिले आहेत. तरीही केंद्रीय पर्यावरण विभागाची अंतिम मंजुरी अद्याप बाकी आहे. मोगरा पंपिंग स्टेशन अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या मागे पाणलोट क्षेत्रात हलविण्यात आले आहे. मात्र, उच्च न्यायालयात जमिनीच्या मालकीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या कायदेशीर बाबींमुळे पंपिंग स्टेशनच्या उभारणीला विलंब झाला. मोगरा पंपिंग स्टेशनचा न्यायालयीन तिढा सुटला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा