Daund-Manmad Railway: पुणे विभागात रेल्वेसाठी ‘कवच’ प्रणाली बसवण्याचे काम सुरू झाले आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानामुळे रेल्वे अपघात कमी होतील. पुणे-कोल्हापूर, दौंड-मनमाड मार्गावर चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
अपघात घटविण्याचा उद्देश
रेल्वे बोर्डाने ‘कवच’प्रणाली प्रामुख्याने रेल्वे अपघातांची संख्या शून्य करण्याच्या आणि रेल्वे प्रवासाची सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने लागू केली. हे स्वदेशी तंत्रज्ञान समोरासमोरच्या टक्कर, लाल सिग्नल ओलांडणे आणि वेग मर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी; तसेच मानवी चुका टाळण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.
Konkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल
टप्प्याटप्प्याने बसविणार
ही प्रणाली सर्वत्र टप्प्याटप्प्याने बसविण्याचे काम सुरू आहे. पुणे रेल्वे विभागात सातशे किलोमीटर अंतर असून, त्या ठिकाणी कवच प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कवचच्या चाचण्यांमध्ये पुणे-कोल्हापूर, दौंड-मनमाड या मार्गाचा समावेश आहे. या ठिकाणच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कवच टप्पा-२ अंतर्गत पढेगाव, बेलापूर आणि राहुरी या तीन स्थानकांवर प्रणालीची स्थापना पूर्ण झाली आहे; तसेच दौंड-येवला विभागात स्थापनेचे काम वेगाने सुरू आहे. दूरसंचार पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नियोजित १२३ टॉवरपैकी ५३ कवच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात आणखी मार्गावर कवच प्रणालीचे काम वेगाने सुरू आहे.
नोव्हेंबरमध्ये काम सुरू
रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली बसवण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. पुणे डिझेल व इलेक्ट्रिक लोको शेड येथे हे काम गेल्या नोव्हेंबर महिन्यात सुरू केले होते. त्यानंतर अवघ्या १८ दिवसांत त्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कालावधीत वॅप-७ प्रकारातील चार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली यशस्वीरीत्या बसवून तपासणीनंतर सेवेसाठी सोडण्यात आली.
Solapur-Mumbai Vande Bharat : सोलापूर-मुंबई वंदे भारत सुसाट, प्रवाशांची एक्स्प्रेसला पसंती; वेळेची बचत आणि सुविधांबाबतही लोकप्रिय
‘टीम’ला नामांकन
कर्नेक्स या संस्थेच्या समन्वयाने उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून हे काम प्रथमच शेडमध्ये पूर्ण करण्यात आले. कार्यक्षमता, वेग आणि गुणवत्तेच्या दृष्टीने काम करणाऱ्या टीमला पुरस्कारासाठी नामांकनही देण्यात आले असून, या उपक्रमाची पुणे विभागाच्या ‘उत्कृष्ट कार्य’ म्हणून नोंद घेण्यात आली आहे.
