• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai Traffic: मुंबईकरांनो, ‘या’ महत्त्वाच्या पुलावर जड वाहनांना 3 महिने ‘नो एन्ट्री’; आता पर्यायी मार्ग कोणते? पाहा नवी नियमावली

    Mumbai Traffic: मुंबईकरांनो, ‘या’ महत्त्वाच्या पुलावर जड वाहनांना 3 महिने ‘नो एन्ट्री’; आता पर्यायी मार्ग कोणते? पाहा नवी नियमावली

    दादरमधील टिळक पुलावर १२ फेब्रुवारी ते १२ मे २०२६ पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सायन व एलफिन्स्टन पुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: वाहतूक कोंडी ही एक आता प्रत्येक देशातील एक प्रमुख समस्या म्हणून समोर येते आहे. भारतातही अनेक ठिकाणी ही समस्या निर्माण होते. महाराष्ट्रटही त्याला अपवाद नाही आहे. राज्यातील मोठी शहरं ही वाहतूक कोंडीला रोज सामोरे जातात. नागरिकांची मोठी गैरसोय यामुळे होते. त्यामुळे आताही मुंबईतून वाहतुकीच्यासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आणि आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर येथील टिळक पुलावर अवजड वाहनांना तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान, पुढील तब्बल तीन महिने ही बंदी असणार आहे. या बंदीमागील कारणही समोर आलं आहे. आज, १२ फेब्रुवारीपासून ही नवी नियमावली लागू झाली असून १२ मे २०२६ पर्यंत हा बदल अमलात राहील, असं या नियमावलीत नमूद करण्यातं आलं आहे. सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत ट्रॅव्हल्स, मिक्सर, डंपर, ट्रेलर आणि इतर जड वाहनांना या पुलावरून प्रवेश नाकारला जाणार आहे, याची दखल नागरिकांनी घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे.

    काय आहे कारण?

    दरम्यान, सध्या एलफिन्स्टन उड्डाणपूल आणि सायन रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबईकडून येणारी वाहतूक सध्या धारावी आणि टिळक पुलाकडे वळवण्यात आली आहे. यामुळे दादर आणि माटुंगा परिसरात मोठी कोंडी होत आहे. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    पूर्व उपनगरे व नवी मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

    मुलुंड, मानखुर्द आणि नवी मुंबईकडून येणारी वाहने टिळक पुलाऐवजी सायन हॉस्पिटल जंक्शनवरून उजवीकडे वळण घेतील. त्यानंतर सुलोचना शेट्टी मार्ग, कुंभारवाडा जंक्शन, कटारिया मार्ग, शोभा हॉटेल, सावरकर रोड, चैत्यभूमी, सिद्धिविनायक मंदिर आणि अप्पासाहेब मराठे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

    Maharashtra TimesParbhani Mayor : परभणीच्या महापौरपदी ठाकरेसेनेचे इकबाल सय्यद, काँग्रेसच्या साथीने सत्ता, भाजप उमेदवाराचा पराभव

    परेल आणि लालबागच्या दिशेने जाणारा पर्यायी दक्षिण मार्ग

    जड वाहनांसाठी दादर टी.टी. ब्रॉडवे जंक्शन ते हिंदमाता ब्रिज, परेल वर्कशॉप, लालबाग ब्रिज खालून, भारतमाता सिग्नल ते गरम खाडा सिग्नलवरून उजवे वळण घेऊन चिंचपोकळी ब्रिजमार्गे पुढे जाऊ शकतील.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून उत्तरेकडे जाणाऱ्या वाहतूकीसाठी

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरून उत्तरेकडे जाणारी जड वाहने टिळक पुलाऐवीजी दादर टी.टी. सर्कल ते माहेश्वरी सर्कल, अरोरा जंक्शन ते सायन हॉस्पिटल, कुंभारवाडा जंक्शन असं करीत कटारिया ब्रिज, सावरकर रोड आणि सिद्धिविनायक मंदिर मार्गे मार्गस्थ होतील.

    सेना भवन ते सायन प्रवासासाठी निर्धारित मार्ग

    सेना भवनकडून येणारी वाहतुकीसाठी- सेना भवन, एल. जे. रोड, शोभा हॉटेल, कटारिया रोड ते कुंभारवाडा जंक्शन आणि सुलोचना शेट्टी मार्ग वापरून सायनच्या दिशेने जाता येईल.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा