• Sun. Jun 7th, 2026

    Ahilyanagar Crime: दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या; घोडेगावात गँगवॉर! रुग्णालयातही हाणामारी, एक ठार; नेवासा तालुक्यात दुसऱ्यांदा रक्तरंजित घटना

    Ahilyanagar Crime: दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या; घोडेगावात गँगवॉर! रुग्णालयातही हाणामारी, एक ठार; नेवासा तालुक्यात दुसऱ्यांदा रक्तरंजित घटना

    अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील घोडेगावात भीषण टोळीयुद्ध! पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबारात ३३ वर्षीय नितीन शिरसाठचा मृत्यू

    नेवासा तालुक्यातील घोडेगावात टोळीयुद्धातून गोळीबार, एक ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात घोडेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या भीषण टोळी युद्धाने परिसर हादरला आहे. पूर्ववैमनस्यातून पेटलेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि यात नितीन विलास शिरसाठ (वय 33) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या गटातील सुरज फुलमाळी (वय 23) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर गावठी कट्ट्यांमधून गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला, तर सुरज फुलमाळी गंभीर जखमी अवस्थेत कोसळला.

    रुग्णालय परिसरातही दोन्ही गट पुन्हा आमनेसामने

    जखमी आणि मयत दोघांनाही तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालय परिसरातही दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाले रुग्णालयातच हाणामारी झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून दोन्ही गटातील काही जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमागे पूर्वीपासून सुरू असलेले वैमनस्य कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत झालेली ही दुसरी गोळीबाराची घटना असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

    बेकायदेशीर शस्त्र गावात येतात कुठून?

    दरम्यान, या सर्व प्रकारानंतर आता असाही सवाल समोर आला आहे की ही सर्व शस्त्रे गावात येतात तरी कुठून. गावठी कट्टे आणि पिस्तुलांचा सर्रास वापर चिंतेचा विषय ठरत आहे. हे बेकायदेशीर शस्त्र गावात येतात कुठून? त्यावर कारवाई का होत नाही? असे सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. घोडेगावातील या रक्तरंजित घटनेमुळे नेवासा तालुका पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत गेला असून पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा