• Sat. Mar 7th, 2026

    सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडवण्यासाठी कटिबद्ध’, जिल्हा नियोजन समितीची भावूक वातावरणात सभा

    सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडवण्यासाठी कटिबद्ध’, जिल्हा नियोजन समितीची भावूक वातावरणात सभा

    सुनील जाधव, बीड : “बीड जिल्ह्याचा पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आणि यंत्रणेने काम करावे”, असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केले. या बैठकीत 2026-2027 चा आराखडा सादर करण्यात आला आणि चालू आर्थिक वर्षाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात 575 कोटींचा नियतव्यय प्राप्त असून यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

    दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे झालेल्या या बैठकीस पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, यांची मुंबईतून तर खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मुंबईत याबाबतचे सादरीकरण केले. जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

    या बैठकीत प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफित दाखवण्यात आली. माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी शोकप्रस्ताव मांडला. या प्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    दुरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची उपस्थिती होती. अत्यंत भावूक वातावरणात झालेल्या या सभेस बीड येथील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

    “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड जिल्हयाविषयी विशेष ओढ होती. या जिल्ह्याचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. जिल्ह्याचा विकास करण्याचे त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकदिलाने आणि प्रमाणिकपणे काम करावे”, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी केले. “त्यांची विकासगंगा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”, असे त्या म्हणाल्या.

    यावेळी कामकाजाचा आढावा सादर करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, “सन 2025-2026 साठी मंजूर नियतव्यय सर्वसाधारण गटासाठी 575 कोटी रूपये इतका आहे. यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून 199 कोटी 64 लक्ष इतकी रकम खर्च झाली आहे. हे प्रमाण नियतव्ययाच्या 34.72 टक्के इतके आहे.”

    अनूसुचित जाती योजनेंतर्गत 129 कोटी नियतव्यय असून प्रशासकीय मान्यता 81 कोटी 57 लक्ष आहे. हे प्रमाण 52.20 टक्के इतके आहे. जिल्हा वार्षिक योजना ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 39 लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला असून 2 कोटी 19 लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 61 लक्ष रुपये खर्च झालेले आहे. खर्चाची टक्केवारी 25.69 टक्के इतकी आहे.

    या बैठकीत सन 2026-2027 चा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. यंदा नियोजन विभागातर्फे 481 कोटी 62 लक्ष कमाल आर्थिक नियतव्यय निर्धारित करुन दिला आहे. त्यानुसार आराखडा नियोजन करण्यात आला असून आज तो बैठकीत सादर झाला. यानंतर जिल्हयाच्या वतीने दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तर बैठकीत तो सादर करण्यात आला. यात अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे.

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed