• Sun. Jun 14th, 2026

    Crime News: नागपूरच्या ‘गुड्डू’चा वणीत गेम; एमडी ड्रग्जसह आलिशान कार जप्त, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई, आंतरजिल्हा तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त

    Crime News: नागपूरच्या ‘गुड्डू’चा वणीत गेम; एमडी ड्रग्जसह आलिशान कार जप्त, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई, आंतरजिल्हा तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त

    यवतमाळच्या शिरपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा दणका दिला आहे. नागपूर कनेक्शन असलेल्या तस्कराकडून ९.८२ लाखांचे एमडी ड्रग्ज आणि आलिशान कार जप्त केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रवी राऊत, यवतमाळ : जिल्ह्यात फोफावत चाललेल्या अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला शिरपूर पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. बुधवारी सायंकाळी केलेल्या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी एका आंतरजिल्हा ड्रग्स तस्कराच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्याकडून तब्बल 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस स्टेशन स्तरावर जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, या धडक कारवाईने ड्रग्स रॅकेटचे धाबे दणाणले आहेत. तर नागरिकांकडून या कारवाईचे कौतुक होत आहे.

    अशी झाली कारवाई

    जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी ड्रग्स बाळगणाऱ्यांवर व सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर शिरपूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार पुनवट येथे राहणारा व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेला श्रेयश उर्फ गुड्डु शशिकांत पाटील (वय 24) हा वणीशिरपूर परिसरात एमडी (मेफेड्रोन) या सिंथेटिक ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

    दोन पथके तयार केली

    या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून चारगाववणी मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. सायंकाळी चारगावकडून वणीकडे येणारी एक संशयित कार थांबवून तपासणी केली असता आरोपीजवळ 57.1 ग्रॅम एमडी ड्रग्स (अंदाजे किंमत 5 लाख 60 हजार रुपये) आढळून आला.

    Maharashtra TimesAir India Plane Crash: एअर इंडियाच्या पायलटनं मुद्दाम विमान पाडलं? सरकारकडून तातडीचं स्पष्टीकरण; सगळं सांगितलं

    त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ड्रग्स मोजण्यासाठी वापरण्यात येणारे तीन डिजिटल वजन काटे (15 हजार रुपये), एक मोबाईल फोन (70 हजार रुपये) तसेच तस्करीसाठी वापरलेली आलिशान कार (4 लाख रुपये) असा एकूण 9 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार संतोष मनवर, सहायक पोलिस निरीक्षक धीरज गुल्हाने, सुरज साबळे, इकबाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, किरण दासरवार व सुनिल दुबे यांनी केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा