• Fri. Mar 6th, 2026
    Nanded Mayor : शिक्षिका ते महापौर, प्रेरणादायी प्रवास, नांदेडमध्ये इतिहास घडला

    नांदेड महापालिका निवडणुकीत 28 वर्षांनी भाजपचा विजय झाला आहे. भाजपच्या पहिल्या महिला महापौर नांदेड महापालिकेत विराजमान झाल्या आहेत. महापौर पदी विराजमान झालेल्या कविता मुळे या पेशाने शिक्षिका आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज करत एक इतिहास घडवला आहे. तब्बल 28 वर्षानंतर भाजपचा महापौर आणि उपमहापौर नांदेड महापालिकेत विराजमान झालाय. महापौरपदी कविता मुळे तर उपमहापौर पदी दीपकसिंह रावत यांची निवड झाली आहे. कविता मुळे या एका सामान्य कुटुंबातील असून पेशाने त्या एक शिक्षिका आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कुटूंबियांसोबत एकनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे. या एकनिष्ठतेमुळे त्यांची शिक्षिका ते नगरसेविका आणि नगरसेविका ते महापौर पदी वर्णी लागली आहे. भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा बहुमान देखील कविता मुळे यांना मिळाला आहे.

    मंगळवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रिये दरम्यान महापौर आणि उपमहापौर यांना 81 पैकी 50 मतं मिळाली आहे. दुसरीकडे काँग्रेस वंचितला 15 मतं, एमआयएम पक्षाला 14 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले. शिवसेना शिंदे गटाचे चार आणि एक अपक्षाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. दरम्यान या विजयानंतर मंगळवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

    शिक्षिका ते महापौर प्रेरणादायी प्रवास

    महापालिकेच्या कविता मुळे या एका सामान्य कुटुंबातील महिला आहेत. एमए बीएडपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. 2015 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या श्री शारदा भवन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कुलमध्ये त्यांची शिक्षिका पदी निवड झाली. त्यानंतर 2017 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी विजय देखील मिळवला. शिक्षक म्हणून काम करताना कविता मुळे यांनी प्रभागातील विविध विकासकामांवर भर दिला. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राजकीय क्षेत्रात त्यांचे पती संतोष मुळे यांचा त्यांना भक्कम साथ देखील मिळाली. विशेष म्हणजे संतोष मुळे आणि कविता मुळे यांची ओळख माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांसोबत असलेल्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणूनही राहिली आहे. चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ते ओळखले जातात.

    अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी मुळे दाम्पत्याने देखील भाजपमध्ये प्रवेश केला. एकनिष्ठेची पावती म्हणून कविता मुळे यांना दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी संधीच सोनं देखील केले. शिवाय नांदेडच्या राजकीय इतिहासात भाजपच्या पहिल्या महापौर बनण्याचा बहुमान कविता मुळे यांनी मिळवला आहे.

    महापालिकेवर भाजपचा झेंडा

    नांदेड महानगर पालिकेवर आतापर्यंत काँग्रेसची सत्ता राहिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला आहे. मात्र चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर नांदेड जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा भाजपने निवडणूक लढवली आणि मोठं यश मिळवत महापालिकेवर पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकवला. 81 पैकी तब्बल 45 जागा भाजपने जिंकल्या. महापालिका स्थापन झाल्या पासून पहिल्यांदा भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान झाला आहे.

    महानगरपालिकेतील सक्रिय कार्य

    • स्थायी समिती सदस्य महिला बालकल्याण समिती सदस्य म्हणून उत्कृष्ट कार्य केले.
    • नगरसेवक म्हणून प्रभागातील रस्ते, स्वच्छता पाणी, दिवाबत्ती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या.
    • ज्येष्ठ नागरिकांसाठी ठिक ठिकाणी आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली.
    • कोरोना या वैश्विक महामारीत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गरजूंना मदत केली. त्यामध्ये धान्याची किट आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या. तसेच घाबरलेल्या जनतेला योग्य ती वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मुळे दाम्पत्याने काम केले.
    • गरजू व्यक्तीला आवश्यक प्रसंगी रक्तपुरवठा व्हावा या हेतूने रक्तदान शिबिरे आयोजित करून हजारो पिशव्या रक्त संकलित केले. त्याचा मोठा फायदा गरजूंना झाला.
    • ऐतिहासिक नांदेड नगरीच्या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महिला महापौर म्हणून संधी मिळाली.
    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा