Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल शंका व्यक्त करत असताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
अजित पवार प्रवास करत असलेलं विमान व्हिएसआर कंपनीच्या मालकीचं होतं. अजित पवार बम्बार्डियर कंपनीनं तयार केलेल्या लियरजेटनं प्रवास करत होते. या कंपनीकडे सर्वाधिक लियरजेट विमानं असल्याची माहिती रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. अजित पवार २७ जानेवारीच्या संध्याकाळीच मुंबईहून बारामतीला कारनं जाणार होते. त्यांचा ताफादेखील सज्ज होता. पण त्या दिवशी संध्याकाळी त्यांना काही कामं मार्गी लावताना उशीर झाला. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती रोहित पवारांनी दिली.
व्हिएसआर कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. विमानांची देखभाल दुरुस्ती, पायलट्सच्या शिफ्ट, त्यांच्या वेळा या सगळ्याबद्दल रोहित पवारांनी धक्कादायक माहिती दिली. विमानाचे पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले, ज्या सुमित कपूर यांना मद्यपानाचं व्यसन आहे, त्यांना अजित पवारांच्या विमानाची जबाबदारी का देण्यात आली, विमान उड्डाण करण्याआधी त्यांची ब्रेथ ऍनलायझर टेस्ट झाली होती, अशी प्रश्नांची सरबत्ती रोहित पवारांनी केली.
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आम्ही व्हिएसआर कंपनीबद्दल बरीच माहिती मिळवली. या कंपनीची एक सवय आहे. या कंपनीच्या विमानांमध्ये मागच्या बाजूला पेट्रोलचे कॅन असतात. त्यात ५०-५० लीटर पेट्रोल राहू शकतं. ही माहिती मला याच कंपनीत काम केलेल्या एका अधिकाऱ्यानं दिली. विमानात अधिकचं इंधन ठेवलं जातं. अशा प्रकारे इंधन ठेवण्याची परवानगी नसते. हा प्रकार अवैध आहे. विमानात पेट्रोलचे कॅन ठेवणं अवैध आहे. अशा प्रकारे पेट्रोल ठेवणं एखादा बॉम्ब ठेवण्यासारखं आहे, असा दावा रोहित पवारांनी केला.
२०२३ मध्ये व्हिएसआर कंपनीच्या लियरजेट विमानाला मुंबईत अपघात झाला. त्या विमान अपघाताचा अहवाल अद्याप आलेला नाही. अजित दादांच्या अपघातानंतर संबंधित यंत्रणेला जाग आली. अपघाताचा तपास अहवाल लवकरच येणार असल्याची बातमी मग समोर आली. मुंबईतील विमानतळावर सर्व सुविधा, अत्याधुनिक यंत्रणा असताना व्हिएसआरच्या विमानाला अपघात कसा काय झाला? बाकीची विमानं तेव्हा व्यवस्थित उतरत असताना व्हिएसआरचं विमान कसं काय घसरलं, असे सवाल रोहित पवारांनी विचारले.
