• Wed. Sep 16th, 2026

महाराष्ट्रात अपघातांचे तांडव

ByMH LIVE NEWS

Feb 9, 2026
महाराष्ट्रात अपघातांचे तांडव

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरु आहे. राज्यात गेल्या २४ तासांत अपघातांच्या भीषण घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मंचर येथे झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

दोन वाहनांचा चक्काचूर; दोन्ही चालकांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा-इसारवाडी महामार्गावर शिवपूर गावाच्या शिवारात काळाने घाला घातला. भरधाव वेगाने येणारा कंटेनर आणि आयशर ट्रक यांची समोरासमोर इतकी जोरदार धडक झाली की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे चालक केबिनमध्येच अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि चालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. सध्या पुढील तपास सुरू आहे.

कंटेनरच्या धडकेत तरुण फायनान्स कर्मचाऱ्याचा अंत

छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरात एका बेजबाबदार कंटेनरचालकामुळे एका तरुण कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. चिकलठाणा आठवडी बाजारासमोरून शहाबाज कमरोद्दीन बागवान (रा. नारेगाव) हे आपल्या दुचाकीवरून मिनी घाटीकडून केम्ब्रिज चौकाकडे जात होते. यावेळी मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शहाबाज यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

लोखंडी पाईप केबिनमध्ये घुसले, चालक आणि क्लीनरचा जागीच अंत

नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम जवळ एक भीषण अपघात झाला. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, ट्रक डिव्हायडरला घासून रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळला. दुर्दैवाची बाब म्हणजे हा अपघात इतक्या तीव्रतेचा होता की ट्रकच्या मागील भागात असलेले जड लोखंडी पाईप केबिनचा पत्रा फाडून थेट आत शिरले. यामध्ये चालक अनिसउद्दीन काझी व क्लीनर मोहम्मद रेहान हे दोघेही चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले आहेत.

शाळकरी मुलांच्या जीवावर बेतला चालकाचा बेजबाबदारपणा

मंचर-पुणे रस्त्यावर एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. मंचरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोने दोन शाळकरी मुलांना जोराची धडक दिली. या अपघातात १२ वर्षीय चिराग गुजर आणि १३ वर्षीय क्रिश तेली हे दोन विद्यार्थी टेम्पोच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण थरार जवळच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत होता. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने चालकाला बेदम चोप दिला. जखमी मुलांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Live News 16th September 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे आणि पावसाचे लाईव्ह अपडेट्स
Manoj Jarange : ‘जरांगे यांची भाषा आक्षेपार्ह’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, मुंबईला येताना कुटुंबासह जनसमुदायाला अश्रू अनावर
Murlidhar Mohol: मंत्र्याच्या ताफ्याला कट मारणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा, तर दगडूशेठ परिसरातील गर्दीत व्हीआयपी ताफा घुसवणाऱ्यांवर काय? पुण्यात नवा वाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed