• Sat. Mar 7th, 2026

    याला म्हणतात जिद्द! अडचणींना जमिनीत गाडलं, दिवसा व्हिडीओ बनवतो, संध्याकाळी पाणीपुरी विकतो, ‘पाणीपुरीवाला बाबू’ची अनोखी कहाणी

    याला म्हणतात जिद्द! अडचणींना जमिनीत गाडलं, दिवसा व्हिडीओ बनवतो, संध्याकाळी पाणीपुरी विकतो, ‘पाणीपुरीवाला बाबू’ची अनोखी कहाणी

    सोशल मीडियावर अनेक तरुण आपले रिल्स बनवत असतात. काही जण सहज, काही जण आवड म्हणून तर काही जण उत्पन्नाचं एक साधन निर्माण व्हावं यासाठी रिल्स बनवत असतात. जळगावचा पाणीपुरीवाला बाबू हा त्यापैकीच एक आहे. त्याने अल्पावधित हजारो फोलोअर्सचा टप्पा गाठला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. पाणीपुरीवाला बाबूने ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत खास बातचित केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : माणसाने स्वप्न पाहणं कधीच सोडू नये. स्वप्न पाहणं ही खूप सुंदर गोष्ट आहे. ही स्वप्न माणासाला प्रोत्साहन देतात. आपल्या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी बळ देतात. त्यामुळे माणसाने स्वप्न पाहणं आवश्यक आहे. कारण एखादं स्वप्न पाहणं हे त्या स्वप्नाच्या मार्गक्रमण करण्यामागचं पहिलं पाऊल आहे, असं मी ठामपणाने म्हणतो. जगप्रसिद्ध लेखक पाओलो कोएलो यांचं ‘द अल्केमिस्ट’ हे खूप सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकात ते स्वप्न पाहणाऱ्या एका गुराख्याची गोष्ट सांगतात. या गोष्टीतल्या गुराखी तरुणाला एकेदिवशी रात्री झाडाखाली झोपलेले असताना इजिप्तच्या पिरॅमिडखाली मोठा खजिना असल्याचं स्वप्नात समजतं. तो गुराखी त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी इजिप्तच्या दिशेला मार्गक्रमण करतो. या प्रवासात तो अनेक अव्हानांना तोंड देतो. त्याचा प्रवास सोपा नसतो. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत आणि जिद्दीने काम करत राहिलो तर संपूर्ण जग आपलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीला पुढे धावतं, असा दृष्टांत त्या पुस्तकात आहे.

    हे उदाहरण सांगण्यामागचं कारण म्हणजे आम्ही आज ज्या तरुणाची कहाणी सांगणार आहोत ती देखील अशीच प्रेरणादायी आहे. हा तरुण खान्देशातला आहे. ‘पाणीपुरीवाला बाबू’ म्हणून तो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. त्याच्या व्हिडीओला हजारो, लाखो लोकं पाहतात. बाबू हा तसा इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवणारा नवीनच आहे. त्याची व्हिडीओ बनवण्याची सुरुवात 8 ते 10 महिन्यांपूर्वीची आहे. पण त्याची लोकप्रियता संपूर्ण खान्देशात वाढत चालली आहे. त्याच्या या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे त्याचं अहिराणी भाषेतून व्हिडीओ बनवणं. अस्सल अहिराणी शब्दांमध्ये तो आपले व्हिडीओ बनवत अनेकांना माहिती देतो, मनोरंजन करतो. त्यामुळे तो अनेक लोकांपर्यंत पोहोचतोय.

    कोण आहे पाणीपुरीवाला बाबू?

    पाणीपुरीवाला बाबूचं खंर नाव भरत चव्हाण असं आहे. तो मूळचा जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील दळवेल या गावचा रहिवासी आहे. भरत हा सुशिक्षित आहे. त्याचं बी.कॉमपर्यंतचं शिक्षण झालं आहे. पदवीधर असूनही त्याने कोणत्या कंपनीत काम न करता व्यवसाय करणं पसंत केलं आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष खूप प्रेरणादायी आहे. पाणीपुरीवाला बाबू हा अवघ्या 25 वर्षांचा तरुण आहे. पण त्याला दैनंदीन जीवनातील संघर्ष आणि जाणिवांनी त्याला अनेकपटीने जास्त प्रगल्भ केलं आहे. आम्ही या बाबूशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने आपण पाणीपुरीच्या व्यवसाय कसा सुरु केला या विषयी माहिती दिली.

    …अन् असा सुरु झाला पाणीपुरीचा व्यवसाय

    बाबूची घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षण संपल्यानंतर तो तालु्क्यातील एका दुकानात काम करु लागला. त्याचे मोठे बंधू जिथे काम करत होते तिथेच बाबू सुद्धा काम करत होता. त्याआधी बाबूने शिक्षण झाल्यानंतर एका कंपनीत काम करण्याचा प्रयत्न केला. पण तिथलं वातावरण पाहता आपली तिथे फार प्रगती होईल असं वाटत नसल्याने बाबूने दुसरं काहीतरी काम करणं पसंत केलं. यानंतर बाबू एका दुकानात काम करु लागला. बाबू आणि त्याच्या मोठ्या भावाची तगमग वडिलांना जाणवत होती. त्याचे वडील हे ट्रक ड्रायव्हर होते. त्यांनी दिवसरात्र मेहनत करुन दोन्ही भावंडांना मोठं केलं होतं. बाबूचं शिक्षण केलं होतं. पण दोन्ही भावंडांची तगमग पाहून वडिलांनी दोघांना पाणीपुरीचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.

    वडिलांच्या शुभहस्ते बाबू आणि त्याच्या भावाचा पाणीपुरीचा स्टॉल सुरु झाला. दोन्ही भावंडांनी जिद्दीने काम केलं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. बाबूचे वडील काही दिवसांनी आजारी पडले. बाबूच्या कुटुंबियांनी वडिलांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. खूप पैसे देखील खर्च केले. पण बाबूच्या वडिलांचं आजारपणात निधन झालं. बाबू आणि त्याच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता. या कठीण प्रसंगातून आणि संकटातून सावरल्यानंतर बाबूने जिद्द केली. मोठा भाऊ आठवडी बाजारांमध्ये दररोज वेगवेगळ्या गावांमध्ये पाणीपुरीचा स्टॉल लावू लागला. तर बाबू गावात आणि इतर गावांमध्ये जावून पाणीपुरीचा व्यवसाय करु लागला. बाबूला आणि त्याच्या मोठ्या भावाला त्यात यश मिळू लागलं. त्यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि ते स्थिर स्थावर झाले.

    बाबू रिल्स्टार कसा बनला?

    यानंतर बाबू सोशल मीडियावरचे व्हिडीओज पाहून प्रभावित झाला. आपण सुद्धा व्हिडीओज बनवावे, ब्लॉगर बनावं असं त्याला वाटू लागलं. त्यातून त्याने व्हिडीओ शूट कसे करावे, ते इडिट कसं करावं हे शिकून घेतलं. यानंतर त्याने आपल्या व्यवसायासोबतच इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून शेअर करणं सुरु केलं. सुरुवातीला बाबूने हिंदीत व्हिडीओ बनवले. पण त्याला गावातील मित्रांनी अहिराणीत व्हिडीओ बनवण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याला खूप उपयोगात पडला. त्याने अहिराणी भाषेत व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळू लागला. त्याला त्याच्या या व्हिडीओजचे हजारो आणि लाखो व्हिव्यूज मिळू लागलो. हजारो नागरिक त्याचे व्हिडीओ पाहू लागले. तो लोकप्रिय होऊ लागला. त्याच्या या लोकप्रियतेचा त्याला त्याच्या पाणीपुरीच्या व्यवसायातही फायदा होऊ लागला.

    लोक लांबून खेड्यापाड्यातून दळवेल या गावी त्याच्या पाणीपुरीच्या स्टॉलला भेटी द्यायला लागले. एवढंच नव्हे तर त्याला प्रमोशनसाठी देखील ऑफर येऊ लागल्या. आता तो विविध दुकानांचे प्रमोशन करतो. त्याला त्याचे पैसे मिळतात. यासोबतच त्या पाणीपुरीच्या व्यवसायातही त्याचा फायदा होता. तो वेगवेगळ्या गावांमध्ये पाणीपुरीचा स्टॉल लावतो. तिथला अनुभव सांगणारा ब्लॉग तो बनवतो. या ब्लॉगमध्ये तो विनोदी शैलीत आपला अनुभव सांगतो. त्यामुळे अनेकांचं मनोरंजन होतं. आम्ही त्याला सोशल मीडियावरील मिळणाऱ्या इन्कम सोर्सविषयी काही प्रश्न विचारले. त्यावर त्याने प्रामाणिकपणे काही उत्तरे देखील दिली.

    चॅनल हिट व्हायला एक व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा असं म्हणतात. ते खरं आहे का?

    बाबू सांगतो, “तसे मी इन्स्टाग्रामवर खूप व्हिडीओ बनवले आहेत. पण सुरुवातीला मी होळीच्या दिवसातला आमच्या बंजारा समाजाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बनवला होता. पारंपरिक कपडे परिधान करुन आम्ही त्या दिवशी होळी साजरी करतो. आमच्या संस्कृतीचं दर्शन करणारा तो व्हिडीओ मी बनवला होता. माझ्या त्या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.”

    इन्स्टाग्रामवर कमाई कशी होते, किती कमवले?

    “इन्स्टाग्रामवर कमाई करण्यासाठी आपले कमीत कमी 1 लाख फॉलोअर्स हवेत. तर मग इन्स्टाग्राम आपल्याला जाहिरात देते. त्यामधून आपल्याला काही पैसे मिळतात. त्यासाठी फॉलोअर्स चांगले पाहिजेत. मला इन्स्टाग्रामकडून काही अजून अधिकृत जाहिरात वगैरे मिळाली नाही. पण थोडेफार प्रमोशनचे पैसे मिळतात. काही लोकांना माझे व्हिडीओ आवडले. त्यांनी मला आपल्या दुकानांची मार्केटिंग करुन द्या, असं सांगितलं. त्यानुसार मी व्हिडीओ बनवले. व्हिडीओ बनवल्यानंतर त्यांना उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांकडून त्यांना फोन गेले. व्हिडीओ पाहिला असं त्यांनी दुकानदारांना सांगितलं. त्या व्हिडीओजचा त्यांना खूप फायदा झाला. त्यांचे ग्राहक वाढले”, असं बाबूने सांगितलं.

    सोशल मीडिया प्रायमरी इनकम सोर्स होऊ शकतो का? नोकरी धंदा न करता फक्त सोशल मीडियावर डिपेन्ड राहता येतं का?

    “सोशल मीडिया हे प्रायमरी इनकम सोर्स होऊ शकतो. पण त्यासाठी मेहनत आणि सातत्याने नाविन्यपूर्ण व्हिडीओज बनवता यायला हवेत. त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं. मी पाणीपुरीचा व्यवसाय सांभाळत आवड म्हणून व्हिडीओ बनवते. माझी ही आता सुरुवात आहे. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी बॅलेन्स करत करतो आहे”, अशी प्रतिक्रिया बाबूने दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा