NCP Sunil Shelke: विलीनीकरणाचा प्रस्ताव नेमका काय आहे, त्यांना एवढी घाई का आहे आणि विलिनीकरण झाल्यास भाजपचे नेतृत्व व विचार मान्य आहेत का, असा सवाल सुनील शेळके यांनी उपस्थित केला आहे.
“शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची एवढी घाई का आहे?” असा सवाल सुनील शेळके यांनी केला असून, “यामागे नेमकं काय आहे, याचा आम्हाला खोलात जाऊन तपास करावा लागेल,” असंही ते म्हणाले. “विलिनीकरण होत असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला भाजपचे नेतृत्व मान्य आहे का? भाजपचे विचार मान्य आहेत का? याबाबतही स्पष्ट भूमिका मांडावी लागेल,” असं मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून या वक्तव्यावर काय प्रत्युत्तर येते आणि ते कोण देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. सुनील शेळके मावळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सुनील शेळके म्हणाले, “अजितदादांच्या कुटुंबामध्ये किंवा शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली, याची आम्हाला कल्पना नाही. आमच्या पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, हे मी जबाबदारीने सांगतो. मात्र कुटुंबात चर्चा झाल्या असतील, तर ते नाकारता येणार नाही. जर अशा चर्चा झाल्या असतील, तर त्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार अजित पवार यांच्याकडे होते. आता पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा अजित पवार आहेत. त्यांना जो निर्णय योग्य वाटेल, तो त्या घेतील. सध्या सर्व अधिकार त्यांच्याकडेच आहेत.”
“जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील, तर केंद्रातील एनडीए तसेच राज्यातील महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेला विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा लागेल. सुनेत्रा अजित पवार सर्व बाबींचा विचार करूनच पुढील भूमिका ठरवतील, आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पुढील काळात त्या कामकाजाला सुरुवात करतील, बैठका घेतील, तेव्हा हा विषय नक्कीच चर्चेला येईल. सध्या सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल आहे. घटना काय सांगते, कायदेशीर तरतुदी काय आहेत, पुढे कसे जायचे, हे सर्व तपासावं लागेल,” असं सुनील शेळके यांनी स्पष्ट केलं आहे.
