पुणे
‘महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांनी आज, शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा मतदान करू नये,’ असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात राहणाऱ्या अनेक नागरिकांची मतदारयादीत दुबार नावे आहेत. या मतदारांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदान केले असल्यास आज गावी जाऊन पुन्हा मतदान करू नये या दृष्टीने जिल्हाधिकारी डुडी यांनी हे आवाहन केले आहे.
‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी आज, शनिवारी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणांकरिता मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असून, मतदानाच्या एक तासापूर्वी ‘मॉकपोल’ घेण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणीदरम्यान दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मतदान केंद्रांवर २३ हजार ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीत जिल्हा प्रशासनाकडे २२, तर राज्य निवडणूक आयोगाकडे एक अशा २३ तक्रारी आल्या आहेत. सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे. मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे,’ असे डुडी यांनी सांगितले.