नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी व निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले होते. पक्षाच्या नेतृत्वाने परवानगी दिली तर मी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करेन, असं गणेश नाईक म्हणाले होते. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या विविध नेत्यांनी नाईक यांच्यावर हल्लाबोल केला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर नाईक यांनी, त्यांच्यातील युद्ध संपल्याचे जाहीर केले. परंतु त्यानंतरही कार्यकर्ते व समर्थकांकडून नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते.महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत संख्याबळ नसतानाही शिवसेनेकडून महापौर, उपमहापौरपदासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आज अखेर शिवसेनेनं अर्ज माघारी घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आणि सुजाता पाटील यांचा महापौरपदाचा तर दशरथ भगत यांचा उपमहापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही महापौरपदाबाबत युतीधर्म पाळला, पण भाजपने उपमहापौरपदही स्वत:कडे ठेवून युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपकडे ५६, तर सेनेकडे ४२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे.