• Tue. Jun 30th, 2026

    दिल्लीत हायव्होल्टेज बैठका

    ByMH LIVE NEWS

    Feb 5, 2026
    दिल्लीत हायव्होल्टेज बैठका
    चंद्रपूर 
    चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळाला असला तरी बहुमताचा आकडा गाठता आला नाही. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर चंद्रपूर काँग्रेसमध्ये अभूतपूर्व घडामोडी बघायला मिळाल्या. काँग्रेसचे दोन मोठ्या नेत्यांमध्ये शितयुद्ध बघायला मिळाले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांचा गट आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक नगरसेवकांचा गट वेगवेगळ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले. स्थानिक पातळीवर वाद मिटत नसल्याने अखेर काँग्रेसच्या दिल्ली दरबारी या विषयावर मंथन झालं. अखेर काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने यावर तोडगा काढला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांसमोर येत, नेमका काय तोडगा काढण्यात आला, याची सविस्तर माहिती दिली.”आमचे विदर्भाचे प्रभारी, मध्य प्रदेशचे माजी आमदार कुणाल चौधरी यांच्या उपस्थितीत प्रदेशने आणि दिल्लीच्या हायकमांडने निर्णय घेतला की, गटनेता राजेश अडूर आणि प्रतिभा धानोरकर म्हणतील त्याला महापौर करु. त्यामुळे आज आमच्याकडून कुणीही महापौर पदाचा अर्ज भरलेला नाही. प्रतिभा धानोरकर यांच्याकडून चार महिलांनी महापौर पदाचा अर्ज भरला आहे. उपमहापौर पदी वसंतराव देशमुख यांचा अर्ज गेलेला आहे”, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

    “आमच्या हायकमांडच्या निर्देशांनुसार, राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. तसं पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे. मेलही केलं आहे. हे सर्व काम आमचे प्रभारी कुणाल चौधरी यांच्या देखरेखेखाली होत आहे. आज पाच वाजेचा वेळ आयुक्तांनी दिलेला आहे. सर्व 27 नगरसेवक काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील आणि उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील, असा निर्णय हायकमांडने घेतला आहे. त्यामुळे आता कुठलीही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही, असं माझं मत आहे”, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

    “आता काही घाई करुन उपयोग नाही. सध्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज केला जात आहे. 10 तारखेला निवडणूक आहे. जनसुराज पार्टी काँग्रेससोबत आहे. त्यांनी अर्ज भरला असेल तरी ते अर्ज मागे घेतील. दुसरा उबाठाने फॉर्म भरला आहे. त्यांच्यासोबत चर्चा करुन मार्ग काढला जाईल. त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करतो आहोत. त्यामुळे अडचण येईल, अशी परिस्थिती नाही”, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

    “उबाठासाठी सुद्धा पर्याय ठेवला आहे. स्टँडिंग कमिटीचं चेअरमनपद उबाठाला देता येईल. सत्तेचं वाटप बरोबर होईल. उबाठासोबत चर्चा सुरु आहे. त्यांनी आज फॉर्म भरला तरी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी खासदार संजय राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं असल्याचं सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed