मुंबईच्या गोरेगावमधील एका इमारतीत एक भीषण प्रकार घडला आहे. लिफ्टमधून एका पिशवीतून फुगे नेत असताना काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत संपूर्ण दुर्घटना कैद झाली आहे. या फुटेजमध्ये एक तरुणी काखेला पर्स लावून आणि हातात एक ट्रॉली घेऊन लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. ती आत येताच तिच्या मागोमाग एक जण येतो. त्याच्याकडे प्लास्टिकची एक मोठी पिशवी असते. त्यात गॅस भरलेले बरेच फुगे असतात. फुग्यांनी भरलेले पिशवी घेऊन तो लिफ्टमध्ये जातो. या मुलाच्या मागोमाग आणखी एक जण आत शिरतो.
तिघे आत शिरताच लिफ्ट बंद होऊ लागते. लिफ्ट पूर्ण बंद होणार तितक्यात फुग्यांचा अचानक स्फोट होतो. आगीच्या ज्वाळा पसरतात. लिफ्टमध्ये असलेले तिघेही जण लिफ्टमधून बाहेर धावतात. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. त्यात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे.
लिफ्टमध्ये झालेला स्फोट काळजाचा थरकाप उडवणारा आहे. स्फोट झाला तेव्हा लिफ्टचं दार उघडलं. लिफ्ट जर बंद असती, तर मोठा अनर्थ घडला असता. कोणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नसती. दुर्घटनेची तीव्रता वाढली असती. फुग्यांचा स्फोट होताच लिफ्टचं दार उघडलं. लिफ्टमध्ये असलेले सगळे जण जीव मुठीत धरुन पळाले. मात्र तरीही या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले.
वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्या, अन्य समारंभांमध्ये फुग्यांचा वापर सर्रास केला जातो. अनेकदा हे फुगे फुलवून कार्यक्रमस्थळी नेले जातात. त्यामुळे ही घटना अनेकांना सतर्क करणारी आहे. अनेकदा मुलं फुग्यांनी खेळतात. तेच फुगे घेऊन लिफ्टमधून प्रवास करतात. हा प्रकार किती धोकादायक ठरु शकतो, याची प्रचिती गोरेगावात घडलेल्या घटनेमुळे आली आहे.
