• Fri. Sep 18th, 2026

Pimpri Chinchwad: पुणे-मुंबई हायवेवर पोलिसांकडून ट्रकचा पाठलाग, गांडूळ खत असल्याची बतावणी, पण तपासणी करताच धक्कादायक बाब उघड

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीविरोधात शिरगाव परंदवडी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका टेम्पोमधून तब्बल 79 लाख 46 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रजनिगंधा गुटखा, सुगंधी तुळशी तंबाखू, वर्ती कंपोस्ट खत तसेच टेम्पोचा समावेश आहे.

महाराष्ट्रात गुटख्याची विक्री आणि साठवणूक प्रतिबंधित असून, त्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शिरगाव परंदवडी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून एका आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा पुण्याहून मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी पोलीस स्टाफसह पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरू केली.

दरम्यान, नवीन उर्से टोलनाक्याजवळ मुंबईकडे जाणारा लाल रंगाचा आयशर टेम्पो पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ टेम्पो थांबवून चालकाकडे वाहनातील मालाबाबत चौकशी केली. चालकाने सुरुवातीला वाहनामध्ये वर्मी कंपोस्ट खत असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.

बॉक्स उघडताच गुटख्याचा साठा उघड

वाहनाचा दरवाजा उघडून पाहणी केली असता, पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये मोठमोठे बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडले असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला रजनिगंधा गुटखा, तुळशी सुगंधी तंबाखू आणि वर्मी कंपोस्ट खताचे गोणी आढळून आले. 42 लाख 43 हजार 200 रुपयांचा रजनीगंधा गुटखा तसेच सुगंधी तुळशी तंबाखू 14 लाख 40 हजार आणि वर्मी कंपोस्ट खत 2 लाख 63 हजार 120 रुपये असा ऐकून 79 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हा संपूर्ण मुद्देमाल पंचनाम्याप्रमाणे दोन पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अमजदुद्दीन ऐनुलहक चौधरी, कर्नाटक, मूळ रा. त्रिपुरा, या टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र सपकाळ, अशोक केंद्रे, प्रकाश पारखे, पोहेकॉ अमोल गोरे, किशोर गिरीगोसावी, सचिन काकडे, पोलीस अंमलदार सुरेश परदेशी, प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड, शिवानंद चव्हाण, सागर कोळी, शुभम राजगुरे आणि रामेश्वर जाधवर यांच्या पथकाने ही विशेष कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed