• Mon. Mar 9th, 2026

    24 तास सरले, आणखी 4 तास वाट पाहावी लागणार

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2026
    24 तास सरले, आणखी 4 तास वाट पाहावी लागणार
    पुणे -प्रतिनिधी 
    मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ एक मोठा टँकर पलटी झाल्याने गेल्या 24 तासांपासून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. हजारो वाहनं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर स्थानबद्ध झाली आहेत. हा मार्ग अजूनही ठप्प आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने एसटी महामंडळाच्या अनेक गाड्या रद्द देखील झाल्या आहेत. अपघातग्रस्त टँकरमध्ये ज्वलनशील वायू असल्यामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली होती. या टँकरमधून गॅसची गळती होत असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला होता. तेव्हापासून संपूर्ण मार्ग ठप्प झाला आहे. वाहनांच्या अनेक किमीपर्यंत रांगा लागल्या. विशेष म्हणजे प्रशासनाने या टँकरला हटवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पण प्रशासनाला त्यात यश आलं नाही. त्यामागे कारण देखील तसंच आहे. आता प्रशासनाने योग्य युक्ती वापरत अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पण यासाठी देखील चार तासांचा कालावधी जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तासांची वाट पाहावी लागणार असल्याचं चिन्हं आहे.
    “पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणारी अजूनही 8 ते 10 किमीची वाहतूक कोंडी आहे. पुण्याकडे जाणारी वाहणांची तीन ते चार किमीची वाहतूक कोंडी आहे. कारण दोन्ही बाजूला म्हणजेच पुण्याच्या बाजूला आणि पनवेल, नवी मुंबईच्या बाजूला आम्ही जड वाहनं थांबवले आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी लवकर सुटेल अशी अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

    “आज सकाळपासून काम सुरु आहे. गॅस गळती बंद करण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. यामध्ये प्लास्ट ऑफ पॅरिस किंवा इतर केमिकल घटकांचा वापर करुन लिकेज बऱ्याच प्रयत्नात कमी करण्यात आले आहे. पण ते शंभर टक्के पूर्ण झालं नव्हतं. त्यामुळे त्याचा दुसरा टप्पा म्हणून पटली झालेल्या टँकरमधील गॅस रिकाम्या टँकरमध्ये भरण्यात आला आहे. एक टँकर आताच भरुन झालेला आहे. त्यानंतर आणखी दोन टँकर आणले आहेत. डिप्रेसराईज करुन गॅस ट्रान्सफर करण्याचं काम होईल. जसं त्यातून वजन कमी होईल, गॅस कमी होईल त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने तो टँकर उचलला जाईल. दुसऱ्या वाहनावर बसवून तो मुहमेंट केला जाईल. त्यानंतर सर्व वाहतूक सुरळीत होईल”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

    “टँकरमधील केमिकल हे खूप ज्वलनशील आहे. ते कोची येथे भरण्यात आलं होतं. हे टँकर गुजरातच्या दिशेला जात होतं. औद्यागिक कामांसाठी या केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव खूप काळजी घेऊन आपल्याला हे ऑपरेशन करावं लागलं. या कामासाठी कमीतकमी चार तास लागतील. सध्या NH48 मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. आम्ही वाहतूक विभागाला डायव्हर्जन प्लॅन देखील दिला आहे”, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed