• Thu. Sep 17th, 2026

मेट्रो 3 मार्गिकेच्या तिकीटावरुन नवा वाद उफाळण्याची शक्यता

ByMH LIVE NEWS

Feb 4, 2026
मेट्रो 3 मार्गिकेच्या तिकीटावरुन नवा वाद उफाळण्याची शक्यता

मुंबई 

मुंबई मेट्रो 3 मार्गिकेच्या तिकीटावर असणाऱ्या नावांवरुन नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वीच या मेट्रो 3 मार्गिकेचं उद्घाटन झालं होतं. महायुती सरकारचा अतिशय महत्त्वकांक्षी असा हा प्रकल्प आहे. या मार्गिकेने हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. मेट्रो 3 मार्गिकेला ‘एक्वा लाईन’ असंही संबोधलं जातं. ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे भूमिगत आहे. विशेष म्हणजे हा मेट्रो मार्ग तब्बल 33.5 किमी लांब आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्जला जोडणारा हा मेट्रो मार्ग आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा खूप सोयिस्कर मार्ग असल्याचं मानलं जातं. या मार्गावर तब्बल 26 भूमिगत मेट्रो स्टेशन आहेत. विशेष म्हणजे मिठी नदीच्या खालून जाणारी ही दुसरी मेट्रो मार्गिका आहे. अतिशय महत्त्वाची असणारी ही मेट्रो मार्गिका आता वेगळ्या कारणाने चर्चेत आली आली आहे. या मेट्रो मार्गिकेच्या दोन प्रमुख आणि महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर देण्यात येणाऱ्या तिकीटांवर जे नाव नोंदवले जाते त्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

मेट्रो 3 मार्गिकेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या तिकीटावर मेट्रो स्थानकांचं नाव ‘सीएसएस टर्मिनस मेट्रो’ असं नाव देण्यात आलं आहे. तर जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाचे नाव तिकीटावर ‘जेएसएम टर्मिनस मेट्रो’ नमूद करण्यात येत आहे. या दोन्ही मेट्रो स्थानकांना देण्यात आलेल्या नावांचा पूर्ण उल्लेख तिकीटावर करण्यात यावा, अशी मागणी आता केली जात आहे. विशेष म्हणजे नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानकडून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवून याबाबतची मागणी करण्यात आली आहे. पुढच्या एक महिन्यात तिकीटावरील नावात सुधारणा करण्यात आली नाही तर आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानक आणि जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकांचा संपूर्ण उल्लेख तिकीटावर असणे अपेक्षित आहे. पण तसा उल्लेख न करता सीएसएम टर्मिनस मेट्रो आणि जेएसएस मेट्रो असा उल्लेख तिकीटावर केला जात असल्याने नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानने नाराजी व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तर जगन्नाथ शंकरशेट यांचा मुंबईच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. या दोन्ही महापुरुषांच्या नावाचा तिकीटावर सीएसएम टर्मिनस मेट्रो आणि जेएसएस मेट्रो असा उल्लेख करणे हा त्यांचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही”, असा इशारा नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed