ठाणे महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड पार पडली आहे. इथे शिवसेना शिंदे गटाचा महापौर विराजमान झालाय. तर उपमहापौर पद भाजपच्या वाटेला आलं आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.
ठाणे महापालिकेत आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीसाठी आलेल्या प्रधान यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना “येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे, हा एक भाग असून ठाणे पालिकेत विरोधी बाकावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बसलेले असताना भ्रष्टाचारासारख्या चुकीच्या मुद्द्यांवर आम्ही एकत्र आवाज उठवण्याचे काम करु शकतो. भविष्यात दोन्ही पक्ष एकञ आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला हे अभ्यासू नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी पक्ष या नावाचा निश्चित विचार करेल”, अशी सूचक प्रतिक्रिया प्रधान यांनी दिली.
दरम्यान, ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. या तिन्ही पक्षांनी आपली स्वतंत्र नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे महापालिकेतील मोठा पक्ष हा राष्ट्रवादी (शप) ठरत असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे आम्हालाच मिळायला हवे, अशी स्पष्ट भूमिका आता राष्ट्रवादीने (शप) घेतली आहे.
वरिष्ठ पातळीवर निर्णय अपेक्षित
याबाबत वरिष्ठ नेते येत्या काळात निर्णय घेतील. पहिल्या महासभेत हा विरोधी पक्षनेता ठरवण्यात येईल. तोपर्यंत या पदाचा नेमका दावेदार स्पष्ट होईल, अशी सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. मात्र विरोधी पक्षनेतेपदासाठी एमआयएची साथ घेणार का? या प्रश्नावर अधिक बोलणे परांजपे यांनी टाळले. दरम्यान, “विरोधी पक्ष नेतेपदाबाबत आम्ही सर्वच पर्याय खुले ठेवले असून वरिष्ठांशी चर्चा करूनच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महापालिका गटनेते नजीब मुल्ला यांनी दिली.
‘हा’ पर्याय खुला
राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमएआयएमने एकत्र येण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांनी आधीच स्वतंत्र गट नोंदणी केली असल्याने ती रद्द करावी लागेल. अखेर विलीनीकरण केल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते, असाही पर्याय समोर येत आहे.
