रायगड
रेवदंडा परिसरात खळबळ उडवणाऱ्या वृद्ध महिलेच्या खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यामागे नात्यातील विश्वासघात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेला लक्ष्य करून तिची निर्घृण हत्या करत सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मयत महिलेचा जावईच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलीद खोपडे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण, सायबर तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक १ महादेव ऊर्फ शिवा राधाकिसन ढोबळे (वय २५) याला आष्टी, जिल्हा बीड येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात आरोपी क्रमांक २ अशोक अजिनाथ भोसले (वय १९) व आरोपी क्रमांक ३ गणेश उत्तम पंडागळे (वय २५) यांना जाटदेवळा, ता. पाथडी येथून, तर आरोपी क्रमांक ४ शुभम एकनाथ पवार (वय २३) याला पेण, जिल्हा रायगड येथून अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपी क्रमांक १ हा मयत वृद्ध महिलेचा जावई असल्याचे उघड झाले असून सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी हा खून केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या हत्या नेमकी कोणत्या पद्धतीने करण्यात आली व चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याबाबत पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरु जाधव करत आहेत.