• Sat. Sep 19th, 2026

‘मॅग्नेट २.०’च्या माध्यमातून गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि मूल्यवर्धनाला चालना – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 16, 2026

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राची कृषी उत्पादन क्षमता भक्कम असून, आता कृषी क्षेत्राच्या पुढील टप्प्यातील विकासासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्ता व्यवस्था, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेल्या मूल्यसाखळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केले. ‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’च्या समारोपीय सत्रात ते बोलत होते.

यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर, पणन सचिव प्रवीण दराडे, पणन संचालक तथा महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम,सरव्यवस्थापक विनायक कोकरे व गुंतवणूकदार उपस्थित होते.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, या गुंतवणूकदार मेळाव्यात विविध कृषी मालाच्या क्षेत्रनिहाय चर्चासत्रांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले. केळी क्षेत्राच्या चर्चेत शेतकरी पातळीवरील एकत्रीकरण व्यवस्था, प्राथमिक टप्प्यातील पायाभूत सुविधा, गुणवत्ता व्यवस्थापन आणि थेट बाजारपेठेशी जोडणी मजबूत करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. जळगाव आणि सोलापूरसारख्या प्रमुख उत्पादन केंद्रांमध्ये लक्ष्यित गुंतवणुकीतून निर्यातीच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. डाळिंब क्षेत्रासाठी निर्यातक्षम पॅकहाऊस, अवशेष तपासणी, प्रतवारी, उत्पादनाचा मागोवा घेण्याची व्यवस्था, शीतसाखळी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिक सक्षम प्रवेश आवश्यक आहे. लिंबूवर्गीय फळांच्या क्षेत्रातही विश्वासार्ह एकत्रीकरण, काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेशी अधिक प्रभावी संपर्क यावर भर देण्यात आला. आंबा क्षेत्राच्या चर्चेत निर्यातीला पूरक पायाभूत सुविधा, गुणवत्ता हमी, प्रक्रिया सुविधा तसेच देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरील प्रीमियम बाजारपेठांपर्यंत पोहोच वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित झाली.

‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलमधून मूल्यवर्धन

सर्व चर्चासत्रांमध्ये प्रस्तावित ‘हब-अँड-स्पोक’ मॉडेलला विशेष महत्व देण्यात आले. या मॉडेलमध्ये ‘स्पोक’ स्वरूपाच्या सुविधा शेतकरी पातळीवरील कृषी मालाचे एकत्रीकरण आणि प्राथमिक हाताळणी मजबूत करतील, तर ‘हब’च्या माध्यमातून आधुनिक प्रक्रिया, शीतसाठवणूक, मूल्यवर्धन आणि निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री रावल यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मेळाव्याला गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्रेते तसेच वित्तीय संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. या मेळाव्याचे यश केवळ चर्चांपुरते मर्यादित न राहता त्यातून प्रत्यक्ष गुंतवणूक, भागीदारी आणि प्रकल्प उभे राहण्यात आहे, असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

मॅग्नेट २.० अंतर्गत सहा प्राधान्य समूह आणि आगामी ‘ईओआय’ प्रक्रियेत मेळाव्यातून मिळालेल्या सूचनांचा उपयोग करण्यात येणार असून, विकसित होणाऱ्या संधी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य, उद्योग क्षेत्राच्या गरजांशी सुसंगत आणि बाजारपेठेच्या मागणीशी जोडलेल्या राहतील, यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारपेठेसाठी केवळ उत्पादन करण्याऐवजी बाजारपेठेच्या गरजेनुसार मूल्यसाखळी उभारली पाहिजे. केवळ कृषी मालाची निर्यात न करता गुणवत्तेची हमी असलेली आणि बाजारपेठेसाठी तयार उत्पादने निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. शासन, उद्योग, गुंतवणूकदार आणि शेतकरी यांनी भागीदार म्हणून एकत्रितपणे सक्षम कृषी-व्यवसाय परिसंस्था उभारली पाहिजे, असे मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले. मेळाव्यात झालेल्या व्यापक चर्चेचे रूपांतर आता प्रत्यक्ष गुंतवणूकयोग्य प्रकल्प, भागीदारी आणि अंमलबजावणीत करण्याची गरज असून, उत्पादनापासून मूल्यनिर्मितीकडे, संधीपासून गुंतवणुकीकडे आणि गुंतवणुकीपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अधिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहनही मंत्री रावल यांनी यावेळी केले.

000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed