मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे जाणार, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोण सांभाळणार, या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरु आहे. या सगळ्या चर्चांवर, शक्यतांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्याशी दोन वेळा चर्चा करुन गेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ‘त्यांनी मला त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती सांगितली. त्यांच्याकडे असलेल्या पर्यायांची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात अंतिम निर्णय त्यांचा पक्ष घेईल,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. दुसरीकडे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेता निवडला जाऊ शकतो. अजित पवार विधिमंडळ गटाचे नेते होते. त्यांच्याचकडे पक्षाची धुरादेखील होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा कार्यभार होता. त्यामुळे आता पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार, हा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर अजित दादांनी अर्थसंकल्पाची बरीच तयारी करुन ठेवलेली आहे. उद्यापासून मी त्या प्रक्रियेत लक्ष घालेन. अर्थसंकल्प कोणी सादर करायचा, ते नंतर ठरवू, असं फडणवीस म्हणाले.