• Tue. Sep 22nd, 2026

बालगृहातील बालकांनी अनुभवला ‘सूर्यकिरण एरोबॅटीक शो’चा थरार; विविध बालगृहातील १८० बालकांची उपस्थिती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jan 27, 2026
बालगृहातील बालकांनी अनुभवला ‘सूर्यकिरण एरोबॅटीक शो’चा थरार; विविध बालगृहातील १८० बालकांची उपस्थिती – महासंवाद

नाशिक, दि. 27 जानेवारी 2026 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा प्रशसान व भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून ‘सूर्यकिरण एरोबॅटीक शो’ पथकाच्या थरारक प्रात्यक्षिकाचा प्रत्यक्ष अनुभव 23 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यातील विविध बालगृहांतील बालकांनी अनुभवला. गंगापूर धरण परिसरात आयोजित या कार्यक्रमात बालकांनी आकाशात सादर होणाऱ्या आकर्षक कसरती, वेगवान विमानांची मांडणी आणि शिस्तबद्ध उड्डाण कौशल्य जवळून पाहिले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास, जिज्ञासा व देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून राबविण्यात आला. हवाई कसरती दरम्यान आकाशात रंगांची उधळण करत सादर करण्यात आलेल्या विविध रचना पाहून बालकांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे १८० बालकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला व बाल विकास विभाग, जिल्हा प्रशासन तसेच बालकल्याण समिती यांचे समन्वयाने नियोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, बालकल्याण समिती नाशिकचे पदाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, तसेच विविध संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती.

या उपक्रमामुळे बालकांना एक वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed