लातूरच्या तांबाळा गटात काँग्रेसला मोठा धक्का! अपहरण झाल्याचा आरोप असलेल्या उमेदवार अंजना चौधरी यांनी २० गाड्यांच्या ताफ्यासह येत अर्ज मागे घेतला.
नेमकं प्रकरण काय?
निलंगा तालुक्यातील तांबाळा गट हा अनुसूचित जमाती (ST) महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचे शनिवार, २४ जानेवारी रोजी उदगीर येथून काही अज्ञात गुंडांनी अपहरण केल्याची तक्रार काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिली होती. “एका वाहनातून त्यांना जबरदस्तीने नेण्यात आले,” असा खळबळजनक दावा स्थानिक नेते रणजीत कोकणे यांनी केला होता.
२० गाड्यांचा ताफा अन् काँग्रेसचा हिरमोड
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळी ११:३० च्या सुमारास सर्वांच्या नजरा निवडणूक कार्यालयाकडे होत्या. तेव्हा अचानक अंजना चौधरी २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी कोणाशीही न बोलता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ज्या उमेदवारासाठी काँग्रेस कार्यकर्ते लढत होते, त्यांनीच माघार घेतल्याने कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.
अमित देशमुखांची ‘बिहार’शी तुलना
या घटनेनंतर राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. “निलंगा तालुक्याचा बिहार झाला आहे का? दिवसाढवळ्या उमेदवारांचे अपहरण होणे लोकशाहीला घातक आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती. या प्रकरणाची दखल थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती.
निवडणूक बिनविरोध होणार?
अंजना चौधरी यांच्या माघारीनंतर आता या रिंगणात भाजपच्या महानंदा तुमकुटे आणि पर्यायी भाजप उमेदवार मीरा तुबाकले अशा दोनच उमेदवार शिल्लक आहेत. यातील एक उमेदवार सध्या ‘नॉट रिचेबल’ असल्याचे बोलले जात आहे. जर दुसऱ्या उमेदवारानेही माघार घेतली, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व प्रकारामागे मोठी राजकीय खेळी असल्याची चर्चा आता लातूर जिल्ह्यात रंगली आहे.
