Girish Mahajan reaction on Atrocity case demand: “तो प्रकार अनवधानाने घडला, मी बाबासाहेबांचा आदर करणारा कार्यकर्ता आहे,” असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजनांनी दिले आहे.
गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
या सर्व वादावर आणि प्रकाश आंबेडकरांच्या मागणीवर गिरीश महाजन यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. महाजन म्हणाले की, “आज घडलेल्या प्रकारामुळे मला खूप वाईट वाटले आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे, पण आजवर कधीही असा प्रसंग आला नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी कायम आदरच केला आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा आम्हीच उभा केला. भाषणात नाव घेण्याचे अनवधानाने राहिले असेल, पण त्यावरून एवढा गदारोळ कशासाठी? मी याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे.”
अॅट्रॉसिटीच्या मागणीवर महाजन म्हणाले…
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या अॅट्रॉसिटी च्या मागणीवर बोलताना महाजन म्हणाले, “अॅट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मी मातंग समाज असो वा वाल्मिकी समाज, त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होतो. लग्नांना जातो, दलित वस्तीत पंगती देतो आणि स्वतः त्यांच्यासोबत जेवायला बसतो. माझ्या ४० वर्षांच्या राजकीय प्रवासात मी निळा शर्ट घातला नाही किंवा समाजाचा सन्मान केला नाही, असे कधीच घडले नाही.”
माधवी जाधव यांच्याबद्दल काय म्हणाले?
कार्यक्रमात जाब विचारणाऱ्या महिला वनरक्षक माधवी जाधव यांच्याबद्दल बोलताना महाजन म्हणाले, “मला माहीत नाही त्या भगिनी कोण आहेत. भुसावळमध्येही विकासकामांसाठी मी कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे” असं त्यांनी म्हटलं आहे..
