सातारा
महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना इव्हेंट नको आहेत, तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंत दाव्होसमध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले, यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा खोचक सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
“मागील दाव्होस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक आणि त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. आपल्याच राज्यातील कंपन्यांबरोबर दाव्होसमध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
कर्नाटकचे मंत्री म्हणतात की, आम्ही दाव्होससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. त्यांचा संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “कर्नाटक सरकारच्या त्या भूमिकेमुळेच परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अदानी आणि लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दाव्होसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
विखे पाटील यांचं प्रत्युत्तर
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या श्वेतपत्रिकाच्या मागणीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोला लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी ही हास्यास्पद असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला आहे. “चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात राज्यातील गुंतवणूक बाहेर गेली. त्यामुळे आपल्या काळात किती गुंतवणूक आली याची श्वेतपत्रिता त्यांनी काढावी”, असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे.