अकोला-प्रतिनिधी
महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली राजकीय चढाओढ आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. निवडणुकीनंतर महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून, महायुतीच्या नेतृत्वात ४४ नगरसेवकांची ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन केली आहे. या गटाची नोंदणी शुक्रवारी संध्याकाळी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे तीन नगरसेवक जे वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या सभेला उपस्थित होते, ते आता भाजपसोबत हात मिळवणी करीत शहर सुधार आघाडीमध्ये सामील झाले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या राजकारणात झालेल्या या प्रचंड उलथापालथीमुळे आता बहुमताची जुळवाजुळव होत असल्याने भाजपची सत्ता महानगरपालिकेत येणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. ३० जानेवारीला महापौर, उपमहापौरपदाची निवड होईल. तत्पूर्वी पाच दिवसांत महापालिकेच्या राजकारणात काय घडामोडी घडतात, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.