• Fri. Jul 3rd, 2026

    ‘फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करु’; एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचे वक्तव्य

    ByMH LIVE NEWS

    Jan 25, 2026
    ‘फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करु’; एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचे वक्तव्य
    ठाणे
     ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात आता पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. “सहर शेखने जे वक्तव्य केले, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सहरने माफी मागावी असे आम्हाला वाटत नव्हते, तिच्यावर दबाव आणला गेला,” असा खळबळजनक दावा जलील यांनी मुंब्र्यात पत्रकार परिषदेत केला आहे.

    “आमच्या पक्षात हिंदू बांधवही निवडून आलेत”

    एमआयएमवर होणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांना उत्तर देताना जलील म्हणाले, “आम्ही सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. मुंबईत आम्ही विजय उबाळे या हिंदू बांधवाला मुस्लीम बहुल भागातून निवडून आणले आणि त्यांना गटनेताही बनवले. मुंब्र्यातून मयूर सारंग निवडून आले आहेत. राज्यातील १२५ जागांवर आमचे अनेक हिंदू उमेदवार विजयी झाले आहेत. हा पराभव पचवणे विरोधकांना कठीण जात असल्याने ते आमची बदनामी करत आहेत.”

    भाजप आणि किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

    “सहरच्या वक्तव्यावर रान पेटवणारे पोलीस नितेश राणे जेव्हा मशिदीत घुसून मारण्याची भाषा करतात, तेव्हा गप्प का असतात? त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का? जर तोतला पुन्हा मुंब्र्यात आला, तर त्याची ‘ब्लू फिल्म’ चौकात दाखवू,” असे विधान करत त्यांनी किरीट सोमय्यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

    “हिरवा रंग काय दहशतवादी शब्द आहे का?”

    एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले, “उपमुख्यमंत्री म्हणतात ठाणे जिल्हा भगवा आहे, मग सहरने मुंब्रा हिरवा करू म्हटले तर ते अयोग्य कसे? हिरवा हा समृद्धीचा रंग आहे, तो काय आतंकी शब्द आहे का? आम्ही येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा (एमआयएममय) करून दाखवू.”

    दरम्यान, यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्या रणनीतीवरही टीका केली. “पहिले हिरव्याला संपवा, मग निळ्याला दलितांना बघू, ही भाजपची चाल आहे,” असा आरोप त्यांनी केला. इम्तियाज जलील यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात मुंब्रा आणि ठाण्याचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed